नगर – शहरातील करोनाला पुन्हा आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिलाने काम करायला हवे. यासाठी चार पथके तयार करण्यात येणार आहेत. या कामात कुचराई करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.
करोनाबाधितांची संख्या पाहता महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात आयुक्त मायकलवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव एस. बी. तडवी, शहर अभियंता सुरेश इथापे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, यंत्र अभियंता परिमल निकम, नगररचनाकार राम चारठणकर, करनिरीक्षक अशोक साबळे, आरोग्य अधिकारी नरसिंह पैठणकर, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख शंकर मिसाळ आदी उपस्थित होते.
आयुक्त मायकलवार म्हणाले, शहरातील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्य प्रश्नांनाही महत्त्व द्यायला हवे. करोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुकुंदनगरमध्ये महापालिकेने यशस्वीपणे करोना अटोक्यात आणला होता. त्यानुसार शहरात महापालिकेचे मोजकेच कर्मचारी काम करतात. महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची दृष्टी नकारात्मक आहे. महापालिकेकडे काम करण्यासाठी एकच पथक तयार आहे. या सर्वांनी एक दिलाने काम करण्याची गरज आयुक्त मायकलवार यांनी व्यक्त केली.
तसेच कर्मचाऱ्यांनी नागरी समस्या सकारात्मकपणे जाणून घ्याव्यात. भविष्यात नगर शहरात करोना रुग्णांची संख्या वाढल्यास काही परिसर हॉटस्पॉट करावे लागतील. त्यावेळी मुकुंदनगर प्रमाणे पूर्ण क्षमतेने काम करा. आजपासून महापालिकेची यंत्रणा करोनासाठी सज्ज करा. यंत्रणा कोलमडू नये यासाठी प्रयत्न करा.