पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वर्ग एक व वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांना गणवेश (ड्रेसकोड) बंधनकारक करण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला. 15 ऑगस्टपासून या आदेशाची अंमलबजावणीही सुरू झाली होती. मात्र, आयुक्त पाटील यांची बदली होताच अधिकाऱ्यांना ड्रेसकोडचा विसर पडला आहे.
गुजरात राज्यातील सुरत महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांना 15 ऑगस्टपासून गणवेश बंधनकारक केला आहे. त्यासाठी महापालिका अधिकारी व महासंघाच्या शिष्टमंडळांने सुरतला जाऊन पाहणी दौरा केला होता. यानंतर सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू करण्याची भूमिका तत्कालीन आयुक्त पाटील यांनी घेतली. आणि तसा आदेश पालिकेच्या कामगार कल्याण विभागामार्फत काढण्यात आला.
या आदेशानुसार महापालिकेतील वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांना ड्रेसकोड बंधनकारक केला. बहुतांशी अधिकाऱ्यांनी दोन ते तीन गणवेश शिलाई करून घेतले. काही अधिकाऱ्यांना शहरात गणवेशाचे कापड मिळाले नाही.
म्हणून पुण्यात जाऊन कापड उपलब्ध करून घेतले. अर्जंटमध्ये शिलाई करून घेतली. मात्र, आयुक्त पाटील यांची 16 ऑगस्टला बदली झाली. त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. पाटील यांची बदली होताच अधिकाऱ्यांनी गणवेश वापरणे बंद करून या आदेशालाच केराची टोपली दाखवली आहे. तर, नवीन आयुक्त शेखर सिंह ड्रेसकोडच्या निर्णयबाबत काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.