अद्यापपर्यंत एकालाही लागण नाही; मात्र पाच संशयितांची रुग्णालयात भरती
पिंपरी – राज्यासह देशात करोनाच्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात हा आजार (विषाणू) रोखण्यासाठी महापालिकेने आपली यंत्रणा सज्ज केली आहे. शहरातील खासगी व महापालिका रुग्णालयात 48 आयसोलेशन बेड तयार ठेवण्यात आले असून, 7 व्हेंटिलेटरची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
पुणे शहरात करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने तातडीने हालचाली करत हा आजार फैलावू नये म्हणून काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेने केलेल्या तयारीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त बोलत होते. या वेळी महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे उपस्थित होते.
चीनमधून आलेले शहरात 31 प्रवासी
पिंपरी-चिंचवड शहरात चीन व इतर देशांतून 31 प्रवासी परतले आहेत. राज्यशासनाच्या आदेशानुसार या प्रवाशांचा पाठपुरावा सुरू असून, यातील 20 प्रवाशांना 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यापैकी कोणालाही लागन झालेली नाही. मात्र, उर्वरित प्रवाशांपैकी 5 जण संशयित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पाचही संशयितांच्या घशाचा नमुना एनआयव्ही, पुणे येथे तपासणीसाठी पाठविला असून, 24 तासांच्या आता त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांना बाधा झाली की नाही, ते स्पष्ट होईल, अशी माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे यांनी दिली.
सोसायट्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करा
करोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शहरातील काही सोसायट्यांकडून विदेशातून येणाऱ्या नागरिकांना सोसायटीच्या बाहेरच थांबविले जात आहे. संबंधित नागरिकांची वैद्यकिय तपासणी करून घेऊन त्यांना सोसायटीत प्रवेश देण्यात यायला हवे. तसेच, याबाबत महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत, अशी भूमिका पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनने घेतली आहे.
पिंपळेसौदागर येथील सोसायटीत मलेशियातून आलेल्या एका व्यक्तीला सोसायटीच्या बाहेरच थांबविण्यात आल्याचे निदर्शनास आले. सोसायटीचा रहिवाशी असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे कायद्याने अडविता येणार नाही. हा संसर्गजन्य रोग असल्याने करोना विषाणुची चाचणी संबंधितांनी करून घ्यायला हवी. तसेच, विदेशातून येणाऱ्या नातेवाईकांची करोनाची चाचणी केल्यानंतरच त्यांना सोसायटीत प्रवेश देण्यात यावा, असे मत फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.