मंचर – महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील हुतात्मा बाबू गेनू यांच्या हुतात्मा स्मारकात हुतात्मा बाबू गेनू यांच्या विषयाची संग्रहित असणारी दुर्मिळ माहिती तहसीलदार यांच्या उपस्थितीत लावण्यात यावी. स्मारकामध्ये लावलेली दुर्मिळ संग्रहित माहिती फ्रेम्स आणि फोटो फ्रेम्स काढल्यावरून तहसीलदार यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्ते गुरुवार (दि. 12 रोजी) उपोषणास बसणार आहेत, अशी माहिती प्रा. वसंतराव भालेराव यांनी दिली.
हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या स्मारकाबाबत आणि त्यांच्यावर आधारित होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांविषयी होत असलेली मनमानी प्रशासनाने थांबवावी. या संदर्भात उपोषण करण्यात येणार आहे. हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठाने उपोषणासंदर्भात राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णांनी याबाबतचा सगळा विषय समजावून घेतल्यावर या प्रकरणात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि शासन दरबारी या उपोषणाची योग्य ती दखल घेण्यासाठी स्वतः
लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी दिली. यावेळी हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष इसामभाई इनामदार, हुतात्मा बाबू गेनू यांचे पुतणे बबन सैद, श्रीदत्त पतसंस्थेचे संस्थापक आणि माजी एकनाथ आंबटकर, विजय पडवळ, भालचंद्र बोठे, बाळासाहेब पडवळ आदी उपस्थित होते.