38 जणांना मिळणार संधी; तीन सदस्यीय प्रभागरचनाही कायम राहणार
पिंपरी – बांठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची होऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूक ओबीसी आरक्षणासह होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाने 31 मे 2022 रोजी सर्वसाधारण जागेसाठी काढलेली आरक्षण सोडत रद्द होणार असून ओबीसी आरक्षणासह नव्याने सोडत काढली जाणार आहे. तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे कायम राहणार आहे.
न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे 38 जणांना ओबीसी कोट्यातून निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे.
ओबीसी आरक्षणाचा मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी फेटाळला होता. त्यामुळे राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ओबीसींशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नकोत, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे महापालिकेची निवडणूक लांबली होती. तर राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने बांठिया आयोगाकडे ओबीसींचा डाटा गोळा करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविली होती. त्यानुसार बांठिया आयोगाने तयार केलेला ओबीसींचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मान्य करून ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याची परवानगी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणुक आयोगाने यापुर्वीच महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार आतापर्यंत महापालिका प्रशासनाने अंतिम प्रभाग रचना, एसटी, एससी आरक्षण सोडतीचे काम पूर्ण केले आहे. तसेच अंतिम मतदार याद्या उद्या (गुरूवार) जाहीर होणार आहेत.
प्रभागरचना कायम राहणार
ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याची परवानगी देताना प्रलंबित सर्व निवडणुकांबाबत पुढील दोन आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. तसेच 10 मार्च रोजीचा कार्यक्रम पुढे सुरू ठेवण्यास सांगितले असून प्रभाग रचनेवरील आक्षेपाबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, असा निर्देश दिल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेली प्रभागरचनाच अंतिम राहण्याची शक्यता आहे. नव्याने नियुक्त झालेले शासन अगोदरच कायद्याच्या कचाट्यात सापडलेले असल्यामुळे चारचा प्रभाग करणार की पुन्हा नव्या न्यायालयीन लढाईत उतरणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, आजच्या निर्णयानुसार तरी तीनचाच प्रभाग कायम राहण्याची शक्यता वाढली आहे.
114 जागांमधून निघणार ओबीसीसाठी सोडत
महापालिकेत 139 जागा असून यातील 70 महिला आणि 69 पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी (एससी) 22 जागा राखीव आहेत. त्यात महिलांसाठी 11 जागा व पुरुषांसाठी 11 जागा पुरुषासांठी राखीव आहेत. तर, अनुसूचित जमाती (एसटी) महिलांसाठी 44, 41 राखीव झाली आहे. तर, प्रभाग क्रमांक 6 मधून एसटी समाजातील पुरुष, महिलेला लढता येईल. ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्याने सर्वसाधारण आरक्षण सोडत रद्द झाली आहे. आता 114 सर्वसाधारण जागांमधून ओबीसींसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ओबीसी समाजाला मिळालेल्या आरक्षणानुसार 38 जागा राहतील. त्यातील निम्या जागा महिला आणि निम्या जागा पुरुषांसाठी राहतील.