पिंपरी -पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) पिंपरी चिंचवड महापालिका 60 कोटी रुपये देणार आहे. आयत्यावेळी या विषयाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. 2) पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी ऍड. नितीन लांडगे होते. स्थायी समितीच्या बैठकीत पीएमपीसाठी 60 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यामध्ये जानेवारी 2022 ची संचलन तुट 13 कोटी 56 लाख रुपये, वैद्यकीय बिलांसाठी 5 कोटी, सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्यासाठी 4 कोटी रुपये आणि इतर देणी देण्यासाठी 37 कोटी 44 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच या बैठकीत विविध विकासकामांसाठी 81 कोटी 64 लाख रुपयांच्या विविध विकासकामांना देखील मंजुरी देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध ठिकाणच्या मिळकतींच्या सुरक्षेसाठी महापालिका कंत्राटी रखवालदार नियुक्त केले जातात. सुरळीत रहदारीच्या कामासाठी वाहतुक पोलिसांच्या मदतीसाठी पालिका ट्रॅफिक वार्डन नियुक्ती करते. एकूण 175 वॉर्डन व एक हजार 465 रखवालदारांची ठेकेदारामार्फत एका वर्षांची नियुक्ती करण्यात आली होती. निविदा न काढता त्याच ठेकेदारांकडून आणखी एका वर्षांसाठी थेट पद्धतीने कर्मचारी घेण्याचा निर्णय सुरक्षा विभागाने घेतला आहे. एका वर्षांसाठी तब्बल 46 कोटी 62 लाख 58 हजार 560 रूपये खर्च असलेल्या या कामाला स्थायीमध्ये मान्यता देण्यात आली.