पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- राज्यातील बदलत्या हवामानामुळे पुढील 24 तासांत विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. तर मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलका पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बदलत्या हवामानामुळे राज्यातील किमान व कमाल तापमानात वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस मराठवड्यातील बीड जिल्हा वगळता अन्यत्र हलका पाऊस पडेल. तर विदर्भातील काही भागात गारांचा तर अन्य भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुण्यात थंडीचे प्रमाण वाढणार
पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाची शक्यता नसून, आकाश निरभ्र राहील. कमाल व किमान तापमानात किंचीत वाढ होईल. मात्र, दि. 13 फेब्रुवारीनंतर उत्तरेकडून येणाऱ्यां थंड वार्यांमुळे किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाल्यामुळे पुन्हा थंडी जाणवू लागेल. दरम्यान, गेल्या 24 तासांत शिरूर तालुक्यात सर्वात कमी 9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ हवेली 10.4, एनडीए 11.1, शिवाजीनगर 11.6, पाषाण 12.9, लोणावळा 14, बारामती 14.3, भोर 14.7, हडपसर 15.4, कोरेगाव पार्क 17.3, वडगावशेरी 17.5 आणि मगरपट्टा परिसरात 18.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.