लोणी धामणी (पुणे)- दरवर्षी प्रमाणे भाद्रपदी बैलपोळ्याची लगबग सुरू झाली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात भाद्रपद अमावास्येला बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पोळ्याचा सण अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपल्याने धामणी येथील कुंभारवाड्यात सोनवणे कुटुंबीय सध्या बैल बनविणे व रंगरंगोटी करण्यात व्यस्त आहेत. हे काम अंतिम टप्यात आले आहे. मात्र करोनाच्या महामारीमुळे यावर्षी बैलपोळा हा सणच संकटात सापडला आहे.
मातीचे बैल बनविण्यासाठी विशिष्ट प्रकारची माती, रंग यासाठी भांडवल उभे केले आहे; मात्र मागील वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी बैलांची विक्री होते की नाही, हा मोठा प्रश्न असल्याचे संपत सोनवणे यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे सोनवणे कुटुंब मातीच्या बैलांची विक्री पुणे शहर व परिसरात करण्यास जात होते; मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी गावापुरते मर्यादित बैल बनवले आहेत. साधारणपणे बैलजोडीची किंमत 50 ते 500 रुपयांपर्यंत आहे.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी आणि शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापरामुळे बैलांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात देखील मातीच्या बैलांचे पूजन घरोघरी केले जाते. चालू वर्षी या परिसरात खरीप हंगामात दमदार पाऊस झाल्याने बळीराजा आनंदी असला तरी करोना महामारीमुळे वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या बैलांचा “बैलपोळा’ यावर्षी थाटामाटात साजरा होणार नसल्याने सर्वच शेतकरी वर्गात नाराजी आहे.