मुंबई – जगभरामध्ये सध्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून अनेक प्रगत देश देखील या विषाणूच्या साथीने मेटाकुटीला आले आहेत. अशातच भारतामध्ये देखील कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसतीये. कोरोनाला वेळीच रोखण्यासाठी सरकारने कंबर कसली असून देशभरामध्ये सध्या २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आलाय.
दरम्यान, देशावरील या संकटाचा सामना करण्यासाठी समाजातील अनेक व्यक्ती व संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या यादीमध्ये आज मुंबई विद्यापीठाचे नाव देखील जोडले गेले असून मुंबई विद्यापीठाने आपल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचे आवाहन केले आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी देखील मदत करावी असे विद्यापीठाकडून सांगण्यात आलंय.
देशभरासह राज्यामध्ये देखील कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारी पातळीवर कठोर उपाययोजना आखण्यात आल्या असून उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यास प्रशासन सज्ज आहे. मात्र नागरिकांनी सरकारतर्फे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे अभिप्रेत असून नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाला अटकाव करणे शक्य असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.
Mumbai University has appealed to all its teaching & non-teaching staff & staff of all affiliated colleges to donate their one day salary for the Chief Minister’s #COVID19 Relief Fund. pic.twitter.com/fdh2YGZeFa
— ANI (@ANI) March 30, 2020