मुंबई सुपर लीग टेबल टेनिस स्पर्धा : सेंच्युरी वॉरियर्सच्या विजयात दिव्याची चमक

मुंबई – महाराष्ट्राची आघाडीची खेळाडू असलेल्या दिव्या देशपांडेच्या चमकदार कामगिरीमुळे युटीटी मुंबई सुपर लीग स्पर्धेत सेंच्युरी वॉरियर्स संघाने ब्लेझिंग बॅशर्स संघावर विजय मिळवला. मुंबईच्या एनएससीआय येथे ही स्पर्धा सुरू आहे.भारताची आठवी मानांकित खेळाडू असलेल्या दिव्याने आपल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत वॉरियर्सला 19-8 असा विजय मिळवून दिला.

समीर भाटेने वॉरियर्स संघासाठी चांगली सुरुवात केली व वेट्रन्स गटात गुरचरण सिंग गिलला 2-1 असे पराभूत केले.यानंतर पुरुष एकेरीच्या सामन्यात भारताचा आघाडीचा खेळाडू असलेल्या रिगन अलबुक्‍यूरेक्‍यूला मंदार हर्डीकरने 2-1 असे नमवित संघाला आघाडी मिळवून दिली. महिला एकेरीच्या सामन्यात दिव्याने श्रुती अमृतेवर 2-1 असा विजय मिळवला. पण, हविश असरानी आणि अदिती सिन्हा याना संघासाठी विजयी फॉर्म कायम राखता आला नाही. त्यांना आदील आनंद आणि टेजल कांबळे यांच्याकडून ज्युनिअर मिश्र दुहेरीत 1-2 असे पराभूत व्हावे लागले.

युवा ध्रुव शाहने मर्व्हन पटेलला 3-0 असे पराभूत करत संघाला पुन्हा विजयी लय मिळवून दिली. दिव्याने यानंतर मंदार हर्डीकरसोबत मिश्र दुहेरीत प्रतिस्पर्धी संघाच्या रिगन अलबुक्‍यूरेक्‍यू व श्रुती अमृतेला 2-1 असे नमविले.यानंतर वॉरियर्ससाठी अदिती सिन्हाने मुलींच्या ज्युनिअर गटातील सामन्यात तेजल कांबळेला 3-0 पराभूत केले व दोन सामने शिल्लक असून देखील संघाचा विजय निश्‍चित केला.यानंतर समीर भाटे आणि ध्रुव शाह यांनी गुरचरण सिंग गिल व मर्व्हन पटेल यांना दुहेरीत 3-0 असे पराभूत केले पण, शेवटच्या सामन्यात हविश असरानीला आदील आनंदकडून 1-2 अशा पराभवाचा सामना करावा लागला.

सकाळच्या सत्रातील अन्य लढतीत कुल स्मॅशर्स संघाने सुप्रिम फायटर्स संघाला 16-11 असे पराभूत केले तर, वेस्ट कोस्ट रेंजर्स संघाने फॅंटम स्टार्स संघापेक्षा सरस कामगिरी करत 18-9 असा विजय मिळवला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.