मुंबई – शहरातील वर्सोवा भागात वेब सीरिजच्या नावाखाली देहविक्री सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका हॉटेलमध्ये हा प्रकार चालू असल्याची मुंबई पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या हॉटेलवर धाड मारत देहविक्रीचा पर्दाफाश केला. यामध्ये तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामध्ये दोन मॉडेल्सचा समावेश आहे.
Maharashtra | Social Service Branch of Mumbai Police's Crime Branch raided a hotel in Versova, busted a sex racket, rescued two models, and arrested another woman: Social Service Branch officer
— ANI (@ANI) June 8, 2021
वर्सोवा परिसरातील एका हॉटेलमध्ये वेबसीरिजच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यावर पोलिसांनी सापळा रचला. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने वर्सोव्यातील या हॉटेलवर धाड टाकून देहविक्रीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे तर २ मॉडेल्सची सूटका केली आहे.
अटक करण्यात आलेली महिला ही वेब सीरिजमध्ये कास्टिंग डायरेक्टर आहे तसेच ब्युटीशियन सुद्धा आहे. मुंबई पोलिसांना या देहविक्रीची माहिती मिळाल्यावर बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर हा ग्राहक घटनास्थळावर पोहोचल्यावर देहविक्री चालवणाऱ्या महिलेने मुलींना बोलावले. त्याचवेळी पोलिसांनी धाड टाकत देहविक्रीचा पर्दाफाश केला. शहरात गेल्या काही दिवसांपुर्वी सुद्धा असाच प्रकार समोर आला होता.