Mumbai Police : मुंबई पोलिसांची 12,899 पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार आजमितीस अप्पर पोलीस आयुक्तपदापासून शिपाईपदापर्यंत 12 हजार 899 पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. तर शिपाई पदांची सर्वाधिक संख्या आहे. यामुळे यंत्रणेवर ताण येत असून मुंबई पोलीस दलात मनुष्यबळाचा तुटवडा भासत असल्याचे समोर येत आहे.
गलगली यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करत सद्यस्थितीत मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती विचारली होती. मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद कांबळे यांनी अनिल गलगली यांना 30 नोव्हेंबर 2023 पर्यंतची माहिती दिली.
यात एकूण मंजूर पदांची संख्या 51,308 आहे. यात 38,409 कार्यरत पदे असून 12,899 पदे रिक्त असल्याची आकडेवारी आहे.
यात पोलीस शिपायाची 28,938 पदे मंजूर आहेत. यापैकी 17,823 कार्यरत पदे असून 11,115 पदे रिक्त आहेत.
यानंतर पोलीस उपनिरीक्षकांची 3543 पदे मंजूर असताना फक्त 2318 कार्यरत पदे असून 1225 पदे रिक्त आहेत. पोलीस निरीक्षक ही 1090 मंजूर पदे असून यापैकी 313 पदे रिक्त असून सध्या 977 कार्यरत पदे आहेत.
सहाय्यक पोलीस आयुक्तांची 141 पैकी 29 पदे रिक्त आहेत. पोलीस उपायुक्त यांची 43 पदे मंजूर असून 39 पदे कार्यरत आहेत. यात 4 पदे रिक्त आहेत, तर अप्पर पोलीस आयुक्तांचे 12 पैकी फक्त 1 पद रिक्त आहे.
सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ
अनिल गलगली यांनी माहिती दिली की, मंजूर पदे ही पूर्वीपासून असून यात काही बदल झाला नाही, पण प्रत्येक वर्षी सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. यात काळानुसार बदल करत रिक्त पदे भरताना मंजूर पदांची संख्या वाढवली, तर मुंबई पोलिसांवर येत असलेला ताण नक्कीच कमी होईल.