मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मोर्चेकरी राजधानी मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कूच करत आहेत. मनोज जरांगे-पाटील २६ जानेवारीपासून आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत. पण, आझाद मैदानात आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
लाखोंच्या संख्येने मोर्चेकरी वाहनांसह मुंबईत येणार आहेत. त्यामुळे मुंबईत दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांना आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
एका मैदानाची परवानगी नाकारल्यानंतर पोलिसांकडून जरांगे यांना आंदोलनासाठी दुसऱ्या मैदानाचा पर्याय देण्यात आला आहे. नवी मुंबईमधील खारगर येथील सेंट्रल पार्कमधील आंतरराष्ट्रीय मैदानाचा पर्याय पोलिसांनी आयोजकांना सुचवला आहे.
आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 149 अंतर्गत ही नोटीस जारी केली आहे. त्यांनी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे आणि आंदोलकांनी या निर्देशांचे पालन केले नाही तर तो न्यायालयाचा अवमान मानला जाईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे.