पुणे – दुखापतीतून पूर्ण बरा होऊन संघात परतलेल्या सूर्यकुमार यादवने तिलक वर्माला साथीला घेत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल स्पर्धेच्या बुधवारी झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सला 4 बाद 161 धावांची समाधानकारक मजल मारुन दिली. अखेरच्या षटकांत अवघे 5 चेंडू खेळत कॅरन पोलार्डने वादळी 22 धावांची खेळी केली व संघाला बळकटी प्राप्त करुन दिली.
कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रतम फलंदाजी दिली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 3 धावा काढून बाद झाला व त्यासाठी त्याने तब्बल 12 चेंडू घेतले. त्यानंतर डेव्हाल्ड ब्रेव्हीसने 19 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 29 धावांची खेळी केली मात्र, अनावश्यक फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. लगेचच इशान किशनही परतला. यावेळी डावाचे 11 वे षटक सुरु होते व मुंबईची अवस्था 3 बाद 55 अशी बिकट बनली होती. मात्र, सूर्यकुमारने तिलक वर्माला साथिला घेत संघाचा डाव सावरला. या जोडीने आक्रमक फलंदाजी करत कोलकाताच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.
दरम्यान सूर्यकुमारने अर्धशतकही साकार केले. त्यानंतर मात्र, 20 व्या षटकांत तो 36 चेंडूत 5 चौकार व 2 षटकार यांच्या मदतीने 52 धावा करुन बाद झाला. त्याने वर्मासह चौथ्या गड्यासाठी 49 चेंडूत 83 धावांची भागीदारी केली. तो बाद झाल्यावर कॅरन पोलार्डने वर्माला साथ दिली. पोलार्डने अवघ्या 5 चेंडूंचा सामना करताना 3 षटकारांसह नाबाद 22 धावा केल्या.
वर्माने 27 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार फटकावताना नाबाद 38 धावा केल्या. या जोडीने पाचव्या गड्यासाठी अवघ्या 5 चेंडूत 23 धावांची भागीदारी केली व संघाला दीडशतकी धावांपेक्षा जास्त मजल मारुन दिली. मुंबईचा डाव 20 षटकांत 4 बाद 161 धावांवर मर्यादीत राहिला. कोलकाताकडून पॅट कमिन्सने 2 गडी बाद केले. तर, उमेश यादव व वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक –
मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 4 बाद 161 धावा. (डेवाल्ड ब्रेव्हीस 29, सूर्यकुमार यादव 52, तिलक वर्मा नाबाद 38, कॅरन पोलार्ड नाबाद 22, पॅट कमिन्स 2-49, उमेश यादव 1-25, वरुण चक्रवर्ती 1-32).