मुंबई – मुंबईतील लोअर परेल भागातील एका इमारतीत लिफ्ट कोसळून सुमारे 14 जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. सर्व जखमींना रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे. महापालिकेच्या वतीने याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबईतील लोअर परेल भागातील ट्रेड वर्ल्ड इमारतीत ही दुर्घटना घडल्याचे समजते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौथ्या मजल्यावरून ही लिफ्ट कोसळली. यात सुमारे 12 ते 14 जण जखमी झाले.
सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सेनापती बापट मार्गवरील कमला मिल इथल्या ट्रेड वर्ल्ड इथे ही दुर्घटना घडली. सोळा मजल्याच्या या इमारतीमध्ये चौथ्या माळ्यावरुन ही लिफ्ट खाली कोसळली. जखमींना ग्लोबल आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींची प्रकृती स्थिर असून कोणीही गंभीर जखमी नसल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. आज सकाळी 10 वाजून 49 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. ट्रेड वर्ल्डमधील सी विंगमधील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन तळमजल्यावर लिफ्ट कोसळली.