पिरंगुट – येथील एका करोनाबाधित महिलेची अंतिम चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे मुळशी तालुका 14 दिवसांनी करोनामुक्त झाला आहे.
तीन एप्रिल रोजी पिरंगुट येथील मध्यवस्तीतील 32 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाली होती. त्यामुळे तहसीलदार कार्यालय, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाच्या मदतीने तात्काळ पिरंगुट परिसर सील करण्यात आला होता.
गुरूवारी (दि. 16) या महिलेची शेवटची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आल्याने त्या महिलेस रात्री साडेनऊ वाजता नायडू हॉस्पिटलमधून शासनाने पिरंगुट येथील घरी आणून सोडले. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 17 जणांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून होता. त्यापैकी कोणालाही कोणा करोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. सूसमधील रुग्णही निगेटिव्ह आलेला आहे.
सध्या मुळशीत एकही करोना रुग्ण नाही; परंतु नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. काळजी घेतली नाही तर पुढील काळात करोनाचा रुग्ण सापडू शकतो. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. सोशल डिस्टन्स पाळावे. सर्दी खोकला ताप त्रास जाणवू लागल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित कारंजकर यांनी केले आहे.
पिरंगुटचे पोलीस पाटील प्रकाश पवळे यांनी सांगितले की, ही एक आनंदाची बातमी आहे. गेले 14 दिवस गावातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. तहसीलदार व इतर प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील उपाययोजना ठरविल्या जातील.