पुणे – अत्यावश्यक कामांव्यतिरिक्त घराबाहेर पडणाऱ्या नागारिकांविरोधात लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. सकाळी फेरफटका मारायला बाहेर पडणारे तसेच विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत तब्बल 1,300 वाहने जप्त केली असून यात सर्वाधिक दुचाकी वाहने आहेत.
लॉकडाउनचा कालावधी वाढल्यानंतर सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे शहरातील संचारबंदी तसेच जमावबंदीचे सुधारित आदेश जारी केले आहेत. प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानंतर शहरातील 22 भागात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.संचारबंदीचे आदेश लागू झाल्यानंतरही शहरात अनेकजण किरकोळ कामांसाठी घराबाहेर पडत आहेत.
सकाळी 10 ते दुपारी 12 यावेळेत शहरातील किराणा माल, भाजीपाला विक्रीची दुकाने खुली ठेवण्यात आली आहेत. तरीही नागरिक किरकोळ कामाचे निमित्त करून घरातून बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे.
करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी नागरिकांनी शक्यतो एकमेकांशी संपर्क टाळावा. सकाळी फिरायला जाणाऱ्यांनी बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
पोलिसांनी केलेल्या आवाहनाकडे कानाडोळा करून अनेकजण घराबाहेर पडत आहेत.अशांविरोधात पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेकजण धास्तावले असल्याचे चित्र आहे.