पुणे -टिळक घराण्याचा वारसा असूनही स्वतःची ओळख निर्माण करणारे नेतृत्त्व अशी आमदार मुक्ता टिळक यांची ओळख राहिली आहे. पेठांमधून सलग चार वेळा त्या नगरसेवक आणि आमदार म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ, समर्पित नेतृत्त्वाबद्दल राजकीय नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेलं एक लढवय्ये नेतृत्व आज आपण गमावलं. आपल्या कामातून मुक्ता टिळक यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच पुणे महापालिकेत सलग चार वेळा नगरसेविका नंतर पुण्याच्या महापौर आणि आमदार हा प्रवास त्या करू शकल्या. आमदार मुक्ताताई टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.
पुण्याच्या माजी महापौर, भाजप आमदार मुक्ता टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कर्तव्यनिष्ठेला महत्त्व देत पक्षादेश प्रमाण मानून त्यांनी शेवटपर्यंत कार्य केले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो.
– नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते विकास मंत्री.
मुक्ताताईंच्या निधनाने पुणे भाजपमध्ये निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. संघटना विस्तारासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु ठेवली. संघटना मजबूत करणे आणि व्यापक जनसंपर्क ठेवण्याची हातोटी वाखाणण्याजोगी होती.नगरसेवक, विरोधीपक्ष नेत्या, महापौर आणि आता आमदार, अशा विविध टप्प्यांवर मुक्ताताईंनी आपली प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे निभावली. एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली, जी संघटनेतील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. ताईंची पक्षनिष्ठा आणि समर्पण कार्यकर्त्यांना कायमस्वरूपी उर्जा देत राहील.
– मुरलीधर मोहोळ, माजी महापौर.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पणतसून आणि त्यांचे नातू जयंतराव टिळक यांच्या सूनबाई आणि विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांना विधानपरिषद सभागृहाच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते. त्यांच्या जाण्याने आपण एका सुसंस्कृत महिला लोकप्रतिनिधीला मुकलो आहोत. त्यांनी मी सुचविलेल्या पुण्याच्या अनेक विषयांवर बैठका घेण्याबद्दल त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांचे आणि माझे वैयक्तिक स्वरूपाचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
– डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद.
आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने सर्वांनाच अतिशय दुःख झाले. मी त्यांना 40 वर्षांपासून ओळखत होतो. त्या शेवटपर्यंत लोकांचे काम करीत राहिल्या. सामान्य लोक त्यांना कधीच विसरणार नाहीत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– प्रकाश जावडेकर, माजी खासदार.
गेली दहा वर्षे मुक्ताताई आणि मी पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात सोबत काम केले आहे. टिळक घराण्याच्या सुनबाई असून देखील मुक्ताताई यांनी सर्वसामान्य जनतेशी घट्ट नाळ जोडली होती. त्यांचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांच्याशी अत्यंत चांगले संबंध होते. पुण्यनगरीच्या विकासासाठी त्यांनी वेळोवेळी सभागृहात घेतलेल्या भूमिका कायमच आपल्या स्मरणात राहतील.
– प्रशांत जगताप, माजी महापौर, राष्ट्रवादी कॉंग्रेस.
आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे. सुमारे 30 वर्षे त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांनी शहरात विविध विकासकामांना चालना दिली होती. विधानसभा सदस्य म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कर्तव्यांना प्राधान्य दिले. पुण्यात विविध सामाजिक कामे करताना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याला त्यांचे प्राधान्य होते.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.
आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आणि वेदनादायी आहे. पक्ष संघटनेचा विस्तार, पक्षबांधणी यासह महापौरपदाच्या काळात आणि आता आमदार असताना त्यांनी शहर विकासासाठी दिलेले योगदान मोलाचे होते. मुक्ताताईंना भावपूर्ण श्रद्धांजली !
– गिरीश बापट, खासदार.
आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्या सदैव स्मरणात राहतील. केवळ पक्षच नव्हे, तर सर्व राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांसाठी त्या आदर्शवत होत्या. संघटन विस्तारासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्या सदैव कार्यमग्न राहिल्या. उत्तम संघटन कौशल्य आणि व्यापक जनसंपर्क हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वाखाणण्याजोगे गुण होते.
– चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, पालकमंत्री, पुणे.
माजी महापौर, आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनानं पुण्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनाशी एकरुप झालेलं व्यक्तिमत्त्वं आज हरपलं आहे. लोकमान्य टिळकांच्या घराण्याचा वारसा त्यांनी यशस्वीपणे जपला. मुक्ताताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!
– अजित पवार, विरोधी पक्षनेते.
आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाची दुःखद वार्ता समजली. त्यांच्या निधनामुळे टिळक कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.
– रूपाली चाकणकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग.
मुक्ताताई टिळक या महापौर म्हणून कार्यरत असताना मी सभागृह नेता म्हणून काम केले. जनहिताची कामे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व निर्भीडपणे करण्याची मुक्ताताई यांची कामाची पद्धत होती. विकासकामांचा पाठपुरावा करताना प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात योग्य संवाद साधून निर्णय घेण्याची त्यांची निर्णय क्षमता चांगली होती.
– श्रीनाथ भिमाले, माजी सभागृह नेता.