मुकेश अंबानी, अरुंधती काटजू आणि मेनका मुरुस्वामी “टाईमचे प्रभावशाली व्यक्‍ती’ 

न्यूयॉर्क – रियालयन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, जनहित याचिका कार्यकर्त्या अरुंधती काटजू आणि समलैंगिक संबंधांबाबतची कायदेशीर लढाई लढाई लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेनका गुरुस्वामी यांना “टाईम’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या प्रतिष्ठेच्या जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्‍तींच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. “टाईम’ मासिकाची 2019 ची ही यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये जगभरातील नेते, बुद्धीमान, कलाकार आणि वर्षातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्‍तींचा समावेश करण्यात आला आहे.

या यादीमध्ये भारतीय वंशाचे अमेरिकन विनोदी कलाकार आणि टिव्ही निवेदक हसन मिन्हाज, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पोप फ्रान्सिस, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, गोल्फपटू टायगर वुडस आणि फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचा समावेश आहे. मुकेश अंबानी यांच्याबाबत महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी विशेष परिचय लिहीला आहे. धीरुभाई अंबानी हे दूरदृष्टी असलेले उद्योजक होते. त्यांच्या रिलायन्स उद्योगाने जागतिक पातळीवर व्यवसाय नेऊन ठेवला. तर मुकेश अंबानी यांनी आपल्या वडिलांच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात उद्योग सुरू केला. रिलायन्स जिओ मोबाईल नेटवर्कने आतापर्यंत 280 दशलक्ष लोकांपर्यंत स्वस्तात 4 जी सेवा दिली आहे. जगभरात प्रत्येकाच्या हाती इंटरनेट देण्याचे रिलायन्सचे लक्ष्य दूर नाही, असेही महिंद्रा यांनी म्हटले आहे.

अरुंधती काटजू आणि मनेका गुरुस्वामी यांच्याबाबत अभिनेत्री प्रियांका चोप्राने गौरवोद्‌गार काढले आहेत. या दोघींनी भारतामध्ये समलैंगिक समुहाच्या समानतेच्या हक्कांसाठी संघर्ष केला. “एलजीबीटीक्‍यु’समुहाला लोकशाही हक्क प्रदान करण्यासाठी या दोघींनी उचललेले पाऊल न्याय्य आहे. कायदा जरी बदलला तरी समाजाने प्रगतीशील राहिले पाहिजे. समजून, स्वीकारून आणि प्रेमाने बदल घडवला पाहिजे, हे या दोघींनी दाखवून दिले, असे प्रियांका चोप्राने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारे घटनेतील 377 वे कलम घटनाबाह्य ठरवले होते. ब्रिटीश वसाहतकाळातील 157 वर्षांपूर्वीचा हा कायदा बदलून सर्वोच्च न्यायालयाने मैलाचा दगड ठरणारा निर्णय दिल्याचे प्रियांका चोप्राने म्हटले आहे. प्रभावशाली व्यक्‍तींच्या यादीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या समावेश वादग्रस्त ठरला. मात्र घुसखोरांबाबतच्या ठाम धोरणामुळे त्यांचा समावेश या यादीमध्ये केला गेला. नेटफ्लिक्‍सवरील “पॅट्रीओट ऍक्‍ट’ या कार्यक्रमातून जगभरातील प्रेक्षककांना “मनमुराद हसवण्यासाठी हसन मिन्हाजचा या यादीमध्ये समावेश केला गेला.

त्याशिवाय अमेरिकेची खुली टेनिस स्पर्धा जिंकणारी खेळाडू नाओमी ओसाका, अभिनेता महेरशला अली, ऑस्कर विजेता कलाकार रामी मालेक, माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामाफोसा, ऑस्कर विजेती गायिका आणि अभिनेत्री लेडी गागा, आबुधाबीचे युवराज मोहमद बिन झ्यायेद, विशेष वकिल रॉबर्ट मुलर आणि अमेरिकेच्या संसदेतील सभापती नॅन्सी पेलोसी यांचाही “टाईम’च्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.