पिंपरी – पिंपरी चिंचवड व आसपासच्या परिसरातील कृषी, उद्योग आणि व्यवसायांना महावितरणच्या नाकर्तेपणाने नुकसानीचे शॉक दिले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नादुरुस्त होणारे डीपी यामुळे उद्योजक, शेतकरी, पशुपालक आणि लहान-मोठे व्यावसायिक अक्षरश: त्रस्त झाले आहेत.
लघुउद्योजकांचे रोज दोन कोटींचे नुकसान
पिंपरी चिंचवड शहरात चिंचवड, भोसरी, तळवडे यासह मावळ, चाकण एमआयडीसी आहेत. येथे हजारो लघु उद्योग आहेत. मात्र, वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे लघुउद्योगांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. कामगारांना बसून राहावे लागते. उद्योजकांना पूर्ण दिवसाचा पगार द्यावा लागतो. तसेच कामे वेळेत होत आर्थिक नुकसान होत आहे. एमआयडीसीमध्ये रोज किमान दोन कोटीचे नुकसान होत असल्याचे पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले.
ई-वाहनांचा प्रश्न
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे नागरिकांचा कल इलक्ट्रिक वाहनांकडे वाढला आहे. इलक्ट्रिक वाहनाची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी चार ते सहा तास लागतात. मात्र, महावितरणच्या अघोषित भारनियमनाचा फटका त्यांनाही बसत आहे. शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा वारंवार व कित्येक तास खंडित होत असल्याने वाहने चार्ज कशी आणि कधी करावी, अशा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर वाहन पूर्ण चार्ज होत नाही. बॅटरी पूर्ण चार्ज होत नसल्याने वाहने रस्त्यात बंद पडत असून वाहन ढकलत न्यावे लागत आहे. तसेच काहींना वाहन असूनही पर्यायी व्यवस्थेचा वापर करावा लागता.
पिंपरी चिंचवड शहरात हजारो लघु उद्योग आहेत. या उद्योगांवर लाखो कुटुंबांची चूल पेटते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तसेच कृषी आणि पशूपालनासाठी प्रख्यात असलेला मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मोठे नुकसान झाले आहे. इतर लहान-मोठ्या व्यवसाय, सूक्ष्म व गृह उद्योगांचे देखील खंडित वीज पुरवठ्यामुळे नुकसान होत आहे.
शेतकरी चिंताग्रस्त
जानेवारी महिन्यात मावळातील अनेक भागातील डीपी जळाले आणि चोरीला गेले अशी कारणे सांगत वीज पुरवठा खंडित करण्यात आला. ही परिस्थिती मार्चपर्यंत होती. मोटार चालत नसल्याने पाणी असूनही शेतीपर्यंत आणता येत नव्हते. अनेकांची पिके संपूर्ण जळाली. वीज पुरवठा सुरळीत करावा, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने केली. मात्र, वीज बिल भरा व नंतर डीपी बसवू असा पवित्रा, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घेतला. त्यानंतर वरिष्ठ स्तरावर चर्चा करून काही डीपी बसविण्यात आले. उन्हामुळे मोकळ्या रानातील गवतही जळाले होते. मुक्या जनावरांना काय खाऊ घालावे, असा प्रश्न रोज शेतकऱ्यांना भेडसावत होता. पीक जळालेले असताना जनावरांना जगविण्यासाठी चारा आणि पाणी विकत आणणाऱ्या बळीराजाचे आर्थिक कंबरडे मोडले.
स्टार्टअपवर परिणाम
करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे अनेकांनी घरगुती उद्योग, व्यवसाय सुरू केला. त्यात महिलांचाही मोठा सहभाग आहे. स्लीपर मेकिंग, प्रिटींग, पॅकींग असे शेकडो लहन उद्योग आणि गृहउद्योग शहरात सुरू आहेत. या सर्वच व्यवसायांचे देखील खंडित वीज पुरवठ्या मुळे नुकसान होत आहे.
व्यावसायिकांचे नुकसान
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी फ्रीजचा वापर करावा लागतो. सर्व पदार्थ नाशवंत असल्याने त्यासाठी वीजेची आवशकता आहे. मात्र, कित्येक तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्यातील सर्व पदार्थ खराब होतात. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी आता खूप कमी प्रमाणात स्टॉक ठेवत आहेत. तर काही दुकानदारांनी फ्रीजची आवश्यकता असणाऱ्या वस्तू ठेवणेच बंद केले.
एमआयडीसी परिसरातील वीज वाहिन्या या सुमारे 25 वर्षांपूर्वीच्या जुन्या आहेत. त्यामुळे त्या बदलणे गरजेचे आहे. तर साधनांची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. एमआयडीसीत वीजपुरवठा नियमितच खंडित होत असतो. किमान 2 तास वीज गेली तरी कामगाराला बसून पगार द्यावा लागतो. त्यामुळे किमान दोन ते तीन कोटींचे रोजचे नुकसान होत आहे. बसवेश्वर कॉम्प्लेक्स येथील वीजपुरवठा चार दिवस बंद होता. येथे 108 गाळे आहेत. त्यातील 60 जणांचा वीजपुरवठा चार दिवसांनी सुरळीत झाला. या काळात त्यांचे मोठे नुकसान झाले.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना.
दूध आणि दुधाशी संबंधित सर्व उत्पादने आमच्याकडे आहेत. मात्र, विजेअभावी मशीनचा वापर करता येत नाही. तसेच फ्रीज बंद रहातो. त्यामुळे पदार्थ खराब होतात. गेल्या तीन दिवसांत दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वीजपुरवठा सुरळीत झाल्यास किमान नुकसान तरी टळेल.
– तुषार वाघोले, मालक, कामधेनू दूध डेअरी.