पुणे -वडिलांचा कीर्तनकाराचा वारसा पुढे चालवण्यात अपयशी झालेल्या नवोदित कीर्तनकाराने चक्क कार सायलेन्सर चोरीचा मार्ग अवलंबला. एका विशिष्ट कंपनीच्या विशिष्ट मॉडेलचेच सायलेन्सर चोरत होता. यातील पॅलेडियम धातूच्या पावडरीला सोन्याचा भाव असल्याने तो एक किलो पॅलेडियम धातूच्या पावडरद्वारे 15 हजार रुपये मध्यस्थामार्फत कमवत होता.
लोणीकाळभोर पोलिसांनी त्याला साथीदारासह 16 एप्रिलला पकडल्यावर पाच गुन्हे उघडकीस आले होते. त्याच्या पोलीस कोठडीतील तपासणीत आणखी नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. एकंदर त्याच्याकडून 14 सायलेन्सर चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. कीर्तनकार शिवप्रसाद पंढरीनाथ रोकडे (21) आणि राम राजेश ढोले (20, दोघेही रा. आळंदी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर परिसरात मारुती ईको कारचे सायलेन्सर चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. पोलिसांनी रोकडे आणि ढोले यांना अटक करून हद्दीतील पाच गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्याकडून 3 लाख 60 हजार रुपयांचे ऐवज हस्तगत करण्यात आला. त्यांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सुभाष काळे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, नितीन गायकवाड, संतोष होले, सुनील नागलोत, श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, अमित साळुंखे, सागर वनवे, राजेश दराडे, बाजीराव वीर, शैलेश कुदळे, दिगंबर साळुंके, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.
…”ती’ पावडर महागडी का?
इको कारच्या सायलेन्सरमध्ये पॅलेडियमचे प्रमाण जास्त आहे. याच्या शुद्ध पावडरला बाजारात सोन्यापेक्षा जास्त भाव मिळतो. सायलेन्सरच्या आत कॅथेलिक कर्न्व्हरटर असतो. त्यातील फिल्टरमध्ये जवळपास 500 ते 600 ग्रॅम पॅलेडियममिश्रित धातूची माती असते. एक किलो माती विकल्यास आरोपींना जवळसाप 15 ते 16 हजार रुपये मिळत होते. या शुद्ध स्वरूपातील धातूची प्रति ग्रॅम किंमत 3 हजार इतकी आहे. प्लॅटिनियम आणि पॅलेडियम हे दोन्ही धातू सोन्यापेक्षा महाग, दुर्मीळ आहेत. त्याची शुद्धतेची प्रक्रिया किचकट असल्याने ते इतके महाग असते.
..असा बनला सायलेन्सर चोर
शिवप्रसादचे वडीत कीर्तनकार आहेत. त्याने काही काळ वडिलांबरोबर कामही केले. मात्र, त्याला यश आले नाही. यामुळे तो चाकण चौकात गॅरेजमध्ये कामाला लागला. तेथे उत्तर प्रदेशातील काही तरुण कामाला होते. त्यांनी शिवप्रसादला ईको व्हॅनचे सायलेन्सरचे “गणित’ सांगितले. यानंतर त्याने राम ढोलेला मदतीला घेऊन सायलेन्सर चोरी सुरू केली. यातील साहित्य तो मध्यस्थामार्फत उत्तर प्रदेशातील शाहबाज खान याला विकले जात होते. तो विकत घेतलेल्या मातीतून धातू वेगळा करून त्याची विक्री करतो. इतर गाड्यांच्या सायलेन्सरमधेही हा धातू असतो मात्र इको गाडीचा सायलेन्सर काढणे सोपे असल्याने आरोपींनी त्याच गाड्यांना
टार्गेट केले होते.