पुणे – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणारे ससूनचे तत्कालिन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांची साक्ष व उलट तपासणी बुधवारी विशेष न्यायालयात नोंदविण्यात आली. शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत डॉ. दाभोलकर यांच्या मेंदू आणि छातीतून दोन बुलेट्स बाहेर काढण्यात आल्याचे डॉ. तावरेंनी न्यायालयाला सांगितले.
विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ससूनचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. हरिश ताटिया आणि डॉ. मनोज शिंदे यांनी केले होते. त्यापैकी डॉ. तावरे यांची साक्ष सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी नोंदवली.
“डॉ. दाभोलकर यांचा मृतदेह सकाळी 11 वाजता ससून रुग्णालयातील शवागारात आणण्यात आला. रुग्णालयाच्या नियमावलीनुसार, दुपारी सव्वा बारा वाजेपर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली,’ अशी साक्ष डॉ. तावरे यांनी नोंदविल्याचे विशेष सरकारी वकील सूर्यवंशी यांनी सांगितले.
बचाव पक्षाचे वकील डॉ. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी डॉ. तावरे यांची उलटतपासणी घेतली. शवविच्छेदनापूर्वीच्या पंचनाम्यात (इनक्वेस्ट पंचनामा) मृतदेहाच्या उजवा पाय आणि नडगीवर जखमा असल्याचे नमूद आहे. शवविच्छेदन करताना या जखमा आढळल्या का, अशी विचारणा बचाव पक्षाच्या वकिलांनी केली. त्यावर शवविच्छेदन करताना या जखमा आढलल्या नाहीत. हा किरकोळ फरक असल्याने त्याबाबत तपास अंमलदारांना सांगितले नाही, असे डॉ. तावरे यांनी न्यायालयात सांगितले.
दरम्यान, रुग्णालयाच्या नियमावलीत शवविच्छेदन करताना मृतदेहाची उंची, वजन आणि केसांचा रंग शक्य आहे तिथे नोंदवावे, असे नमूद असताना डॉ. दाभोलकरांच्या मृतदेहाचे याबाबतचे तपशील का नोंदविले नाहीत, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी विचारले असता, त्यावेळी शवागारात संबंधित मशीन उपलब्ध नसावे, असे डॉ. तावरे यांनी सांगितले. दरम्यान, 6 मे रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.