पौड -निसर्ग चक्रीवादळामुळे मुळशी तालुक्याच्या धरण भागात वीजपुरवठा विस्कळीत झालेला आहे. तो अद्याप पूर्ववत न झाल्याने ग्रामस्थांची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी या भागाचा दौरा करून सर्व वीज पुरवठा लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे आश्वासन मुळशीकरांना दिले.
खासदार सुप्रिया सुळे मुळशीतला आढावा घेण्यासाठी शनिवारी (दि. 20) या भागात आल्या होत्या. त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये धरणभागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्याची पाहणी करण्याची सूचना सुळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार मंगळवारी (दि. 23) महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता बुंदेले, उपअभियंता फुलचंद फड, प्रविण शिंदे, माजी सभापती बाबा कंधारे, माजी सरपंच माऊली कांबळे, विनायक कोकरे उपस्थित होते.
यावेळी निवे, चोरघेवाडी, मोहरी, शिरगाव, वडगाव, वाघवाडी, भादस, खोंडा, लिंबारवाडी, वडूस्ते, वाद्रे-भोरकस, पिंपरी अहिरवाडी, गोटा मापारी, बार्पे, आडगाव, घुटके, भांबार्डे आदी गावची पाहणी करण्यात आली. पिंपरीपर्यंत वीजपुरवठा चालू झाला असल्याचे सांगत उर्वरीत गावाचा वीज पुरवठा दोन दिवसांत सुरू होईल असे सांगितले. कठीण काळात महावितरणचे अधिकारी, कर्मचारी सुट्टी न घेता काम करतात. त्यामुळे ग्रामस्थांनी आभार मानले.