पुणे(प्रतिनिधी) : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने विविध तक्रार निवारणासाठी महावितरणच्या सर्व ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी वेबिनार किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहे. या आदेशाची पुणे प्रादेशिक विभागात तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक (प्र) अंकुश नाळे यांनी दिले आहे.
करोना विषाणूमुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सर्व वर्गवारीतील ग्राहकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे थेट संवाद साधून वीजपुरवठा, वीजबिल, वीजयंत्रणेची दुरुस्ती आदींबाबत तक्रारी प्रश्न, अपेक्षा व अडचणी जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्याचे तसेच ग्राहकांना महावितरणच्या विविध सेवांची माहिती उपलब्ध करून देण्याचे डॉ. राऊत यांनी दिले आहेत.
या अनुषंगाने पुणे प्रादेशिक संचालक (प्र) अंकुश नाळे यांनी मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांना विभाग व उपविभागस्तरावर व्हीडीओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करावे आणि वीजग्राहकांशी संवाद साधून त्यांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्याचे आदेश दिले आहे. या वीजग्राहकांसाठी संबंधित मंडलचे अधीक्षक अभियंता हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या आयोजनाची तारीख व वेळेची पूर्वमाहिती संबंधीत स्थानिक कार्यालयाकडून वीजग्राहकांना कळविण्यात येणार आहे.
याआधी प्रादेशिक संचालक (प्र.) नाळे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महावितरणचे सुमारे 1800 अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांशी तसेच रिडींग व बिल वाटप एजंसी, विविध योजनांमधील कंत्राटदार आदींशी थेट संवाद साधून कामांचा आढावा घेतला आहे. यासोबतच पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार व गणेशखिंड मंडलचे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार यांनी 180 सोसायट्यांच्या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांशी स्थानिक अभियंत्यांसमवेत नुकताच वेबिनारद्वारे संवाद साधला आहे.