सहा राष्ट्रवादी, दोन शिवसेना, तर दोन कॉंग्रेसच्या ताब्यात
सहा पंचायत समित्यांमध्ये महिलाराज अवतरले
पुणे (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीमुळे सदस्यांना नूतन वर्षाचे गिफ्ट’ मिळाले आहे. नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील 13 पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 7 सभापती, तर 8 उपसभापतींची निवड झाली आहे. मात्र, जिल्ह्याचा बालेकिल्ला असणाऱ्या हवेली पंचायत समितीमध्ये आरक्षण सोडतीचा फटका राष्ट्रवादीला बसला असून, या पंचायत समितीवर भाजपाच्या महिला सदस्यांची निवड झाली.
जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिला पदासाठी आरक्षित आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून निवडीचे वेध लागले असताना, त्या अधीच पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत होवून आज निवडीही झाल्या. त्यामध्ये जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांमध्ये महिलाराज असणार आहे. या सभापती निवडीमध्ये बहुतांश निवडी या बिनविरोध झाल्या. पुढील अडीच वर्षासाठी बारामती पंचायत समिती सभापतीचा मान सुपे गटातील राष्ट्रवादीच्या निता संजय बारवकर यांना मिळाला आहे. तर उपसभापती म्हणून कोऱ्हाळे गटातील प्रदीप धापटे यांना मिळाला आहे.
दरम्यान, या निवडीनंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आली. यावेळी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. शिरूर पंचायत समितीवर महिलाराज अवतरल्याने महिलावर्गातून आनंद व्यक्त करण्यात आला. हवेली पंचायत समितीची निवडणूक लक्षवेधी ठरली. चुरशीच्या निवडीत राष्ट्रवादीला चिठ्ठीमुळे उपसभापतिपद मिळाले.
राष्ट्रवादीचे सभापती, उपसभापती
बारामती- नीता संजय बारवकर, प्रदीप धापटे. दौंड- आशा नितीन शितोळे, नितीन शांताराम दोरगे. आंबेगाव- संजय गवारी, संतोष यमनाजी भोर. शिरूर- मोनिका नवनाथ हरगुडे, सविता प्रमोद पऱ्हाड. मुळशी- पांडुंरंग मारूती ओझरकर, विजय अरूण केदारी.
भोर- श्रीधर रघुनाथ केंद्रे, दमयंती जाधव.
इतर पक्षांचे कारभारी
पुरंदर- नलिनी दोरगे, गोरखनाथ माने (दोघे शिवसेना), वेल्हे- दिनकर सरपाले, सीमा विष्णु राऊत (दोघे कॉंग्रेस). इंदापूर- पुष्पा रेडके, संजय पंढरीनाथ देहाडे (दोघे कॉंग्रेस). खेड- अंकुश राक्षे, ज्योती अरगडे (दोघे शिवसेना). हवेली- फुलाबाई कदम (भाजप), युगंधर काळभोर (राष्ट्रवादी). मावळ- निकिता घोटकुले (भाजप) दत्तात्रय शेवाळे (राष्ट्रवादी), जुन्नर- विशाल तांबे (राष्ट्रवादी), रमेश खुडे (शिवसेना).