DySP व्हायचं स्वप्न अर्धवटच; पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्याचा करोनाने दुर्दैवी मृत्यू

पुणे – संपूर्ण महाराष्ट्राला करोनाने घेरलं आहे. त्यातच विद्येचं माहेर म्हणून परिचीत असलेल्या पुण्यातील करोनाची रुग्णसंख्या आता सर्वाधिक आहे. राज्यभरातून एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी पुण्या येतात. अनेक प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करतात. मात्र करोनामुळे अनेकांचे स्वप्न लांबणीवर पडले आहेत. मात्र श्रीगोंदा येथील वैभव शितोळे या विद्यार्थ्याचं DySP होण्याचं स्पप्न करोनामुळे स्वप्नच राहिलं आहे. करोनामुळे वैभवचं निधन झालं.

वैभव 2014 साली पुण्यात एमपीएससीची तयारी करण्यासाठी आला होता. त्याने याआधी अनेक परीक्षा देखील दिल्या होत्या. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात तो सहभागी झाला होता. आंदोलनानंतर तीन दिवसांनी त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तो रुग्णालयात दाखल झाला होता. त्यामुळं त्याला परीक्षा देखील देता आली नव्हती. रुग्णालयात त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत होती. परंतु शुक्रवारी त्याची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला.

नाशिक येथे इंजिनिअरींग पूर्ण केलेल्या वैभवला एक बहीण आहे, तिचं नुकताच लग्न झालं. तर आई-वडिल शेती करतात. आई-वडिलांसाठी तो एकुलता एक होता. वैभवला पोलीसमध्ये जायचं होतं. DySP होण्याचं त्याचं स्वप्न होतं. त्यामुळं तो लॉकडाऊन काळात घरी देखील गेला नव्हता. मात्र तोच राहिला नाही. वैभवच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.