पायल तडवी आत्महत्या प्रकरण : खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

मुंबई – वरिष्ठ डॉक्‍टरांच्या रॅगिंगला कंटाळून 26 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्‍टर पायल तडवी यांनी 22 मे रोजी रुग्णालयाच्या परिसरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्‍टरांनी जातीयवादी टीका करून पायलचे रॅगिंग केल्याचा आरोप पायल यांच्या कुटुंबीयांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषी असणाऱ्यांनावर कठोर कारवाई करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

यासंदर्भात ट्विट करत त्यांनी म्हटलं आहे की, “रॅगींगचा बळी ठरलेल्या डॉ पायल तडवी यांना न्याय मिळालाच पाहिजे. आदिवासी समाजातील तरुणी वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण घेत असताना तिच्यावर अशी वेळ ओढावते हे खेदजनक आहे”.

रॅगींगला कायद्याने बंदी असताना अशा प्रकारांना पायबंद घालण्यात सरकारला अपयश का येतंय ? असा सवाल देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

पायल तडवी आत्महत्ये प्रकरणी गिरीश महाजनांनी कुटुंबियांची भेट घेऊन पायलला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान, आज नायर हॉस्पिलमधील स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. यी चिंग लिंग, वरिष्ठ निवासी डॉक्टर हेमा आहुजा, डॉ. भक्ती महिरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहा जणांच्या समितीची नेमणूक करण्यात आली होती. समितीने चौकशी करून दिलेल्या अहवालानंतर चारही डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.