पाचगणी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच्या धावपळीतून आपल्या जन्मगावी महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब येथे आल्यावर आपल्या शेतात स्वतः शेतकरी बनून कामे करतात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे दोन दिवसांपासून भात लागणीत मग्न झाले होते.
कोयनाकाठचे शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावी दरे तर्फ तांब येथे आल्यावर अगदी मनापासून शेतीच्या कामात मग्न होतात. त्यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे हेही आता शेतीत भात लावणी करताना मग्न झालेले दिसले. आपल्या शेतात त्यांनी मशीनच्या साह्याने चिखल केला. तर त्यापाठोपाठ त्यांनी भाताचा तरवा काढण्यासही मदत केली. चिखल करण्यासही ते मदत करत होते.
बऱ्याचदा उच्चपदस्थ मंडळी शेतीच्या नादाला लागत नाहीत. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाने आपल्या गावाची आणि शेतीची नाळ कधीही कमी पडू दिली नाही. मी कोण मोठा आहे हे न दाखवता ते नेहमी गावी आल्यावर शेतात झाडे लावणे, स्ट्रॉबेरी लागवड, भात शेती यांची कामे ते करतात. त्यामुळे आता मुख्यमंत्री झाले तरी एकनाथ शिंदे शेतात जात होते. काल आणि परवा खासदार श्रीकांत शिंदे गावी आले होते. ते दोन दिवस भातलागणी करण्यात मग्न झाले होते.
बळीराजाच्या कष्टाची जाणीव
पानापानातुन वाढणारे झाड, भातशेतीत मळ्यात वाढणारी भातरोपं, जिवंत बहरणारा हिरवा डोंगर आणि पावसाचा कणाकणात रुजण्याचा सोहळा हे सगळं पाहणे म्हणजे एक ऊर्जा असते. शेतीत राबताना त्या बळीराजाच्या कष्टाची जाणीव आपल्या हातात असलेल्या जबाबदारीची जाणीव देते. आज भाताची लावणी करताना तीच जाणीव प्रत्येक रोपात होती, असे खा. श्रीकांत शिंदे यांनी म्हंटले आहे.