– मंगेश रत्नाकर
नारायणगाव – अभिनय क्षेत्रात नावलौकिक कमावल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून काम करण्याची संधी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना मिळाली होती; परंतु मतदारसंघाकडे कायमच त्यांचे दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांच्यावर वारंवर होत आहे. तर आता पक्षातील कार्यक्रमात मोठे नेते उपस्थित असतात तिथे खासदार डॉ. कोल्हे गैरहजर असतात. तर ज्या ठिकाणी कोल्हे हजर असतात तिथे मोठे नेते पाठ फिरवतात त्यामुळे खासदार डॉ. कोल्हेंबाबत पक्षात “पाठ शिवणी’चा खेळ सुरू आहे का? तसेच खासदार कोल्हेंच्या मनात नेमके आहे तरी काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
पक्षात घुसमट?
डॉ. अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादी पक्षात घुसमट तर होत नाही ना? अशी शंका सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात येऊ लागली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या शिर्डी येथे झालेल्या चिंतन शिबिराकडे कोल्हे यांनी पाठ फिरवली, गुजरात राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचे नाव नसणे,
दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व रावसाहेब दानवे यांची झालेली भेट, चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीत स्टार प्रचारकांच्या यादीत नाव असतानाही प्रचारात रॅली, सभा, रोड शोमध्ये सहभागी न होणे यासारख्या घडत असलेल्या घटनांमुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मनात नेमके आहे तरी काय, असा प्रश्न निर्माण होतो आहे.
ग्लोबल कृषी प्रदर्शनास अनुपस्थिती
नारायणगाव येथे कृषी विज्ञान केंद्र आयोजित ग्लोबल कृषी प्रदर्शनात समारोपाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती खासदार डॉ. कोल्हे यांना करण्यात आली होती. त्यानुसार कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके उपस्थित होते; परंतु डॉ. कोल्हे मुंबईत असूनही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.
अभिनयाबरोबरच लोकसेवेची संधी
शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर त्यांनी भगवा निषेध आंदोलन केले; परंतु आंदोलनाला राष्ट्रवादी पक्षाचा एकही मोठा नेता उपस्थित नसल्याचे जाणवत होते. गेल्या काही महिन्यांपासून डॉ. कोल्हे ज्या कार्यक्रमांना हजर असतात त्या व्यासपीठावर पक्षाचे इतर मोठे नेते दिसत नाही तर पक्षाचे नेते ज्या व्यासपीठावर असतात तिथे डॉ. कोल्हे कार्यक्रमास गैरहजर राहतात हे मतदारांच्या लक्षात येऊ लागले आहे.
त्यामुळे डॉ. अमोल कोल्हे यांनी अभिनय करत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असल्याने मतदारांची नाराजी ओढवून घेणे त्यांना परवडणारे नाही. लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची जी संधी मिळाली त्याचं सोने करावे ही कार्यकर्त्यांसह मतदारांची माफक अपेक्षा आहे.
मनात नेमके आहे तरी काय?
चर्चा तर होणारच..
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांची भाजपाशी वाढलेली जवळीक पाहून डॉ. कोल्हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा वाढू लागल्या. एवढेच नाही तर त्यांना अभिनयामुळे मतदारसंघाकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही असे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते खासगीत बोलू लागले. 2024 च्या निवडणुकीत डॉ.अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली तर पुन्हा निवडणूक लढवतील का? आणि लढवली तर यश मिळेल का? यावरही कार्यकर्ते चर्चा करू लागले आहे.