नगर – रब्बीतील हरभरा पीक तयार होऊन पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी उलटला असला तरी अजूनही शासकीय खरेदीला सुरुवात झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांशिवाय पर्याय उरला नाही. व्यापाऱ्यांनी दर पाडल्याने शेतकऱ्यांचे क्विंटल मागे 800 ते हजार रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासन हमीभावाने हरभरा खरेदी कधी करणार? असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता लवकरच शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाने दरवर्षी हरभऱ्याचा हमीभाव 5 हजार 335 जाहीर केला आहे.देखील बाजार समितीमध्ये मात्र 4 हजार 500 ते 4 हजार 600 हा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. रब्बीतील हरभरा हे पीक महत्त्वाचे आहे. मागील 15 ते 20 दिवसांपासून हे पीक तयार होऊन हरभरा बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे.
मागील आठवडाभरापासून हरभऱ्याची आवकही वाढली आहे. शेतकरी अडचणीत असल्यामुळे मिळेल, त्या भावात विक्री करीत आहेत. फेब्रुवारी महिना संपत आला तरी अजूनही शासनाने हमीभावाने हरभरा खरेदी सुरू केली नाही. परिणामी, शेतकऱ्यांची क्विंटल मागे आठशे ते हजार रुपयाचे नुकसान होत आहे.दरवर्षी शासनाचे वरातीमागून घोडे असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने फक्कड हमीभावाने हरभरा खरेदी सुरू करावी, अशी मागणी वेगवेगळ्या संघटनांसह शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
शेतकरी चिंतेत
शासनाकडून शासकीय हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याला उशिर होत असतो. तोपर्यंत शेतकऱ्यांचा बराचसा शेतमाल हा खासगी व्यापाऱ्याला गरजेपोटी विक्री केला जातो. घाम गाळूनही शेतमालाला हमी भाव मिळत नाही. शासन केवळ हमीभावाचे गाजर दाखवते. प्रत्यक्षात तेवढा भाव मिळत नाही. त्यामुळे कर्जबाजारी होऊन बळीराजाला हातबट्ट्याचा खेळ दरवर्षी खेळावा लागतो. मात्र शासनाला याचे कुठलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते.
नाफेडकडून अद्याप कोणतेही निर्देश आलेले नाही. मात्र शेतकऱ्यांची लवकरच नोंदणी सुरू करून हरभरा खरेदी केंद्र सुरू होतील. 5 हजार 335 हमीभाव देण्याचे ठरले आहे. येत्या तीन ते चार दिवसांत आदेश मिळतील. त्यानुसार खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल. जिल्ह्यात सात केंद्र सुरू होतील.
श्रीकांत आभाळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी
हरभऱ्याची बाजारात आवक मोठ्या प्रमाणावर सध्या सुरू आहे.दररोज तीन ते चार मालमोटारीमधून हरभरा येत आहे. शेतकऱ्यांना 4 हजार 600 ते 4 हजार 700 रुपये असा दर देण्यात येत आहे.
अंबादास पांडूळे, श्रीदत्त ट्रेडर्स, नगर