पुणे: माऊंट एव्हरेस्टपेक्षाही कठीण समजले जाणारे शिखर अशी ओळख असलेल्या नेपाळमधील खुंबू परदेशात स्थित माऊंट अमा दब्लम या 6812 मीटर उंच शिखरावर गिरीप्रेमीच्या विवेक शिवदे व जितेंद्र गवारे या अनुभवी गिर्यारोहकांनी 29 ऑक्टोबर रोजी पहाटे शिखरमाथ्यावर यशस्वी चढाई केली.
तांत्रिकदृष्ट्य्ा चढाईसाठी कठीण असलेल्या शिखरावर अत्यंत तंत्रशुद्धपणे चढाई करत गवारे व शिवदे यांनी आपल्या गिर्यारोहण कौशल्यांचे प्रदर्शन केले. शिवदे व गवारे हे दोघेही अनुभवी गिर्यारोहक असून याआधी विविध शिखर मोहिमा त्यांनी यशस्वी केल्या आहेत.
मे 2019 मध्ये दोघांनीही गिरीप्रेमीच्या माऊंट कांचनजुंगा ईको इक्स्पीडिशन 2019 अंतर्गत जगातील तिसरे उंच शिखर असलेल्या माऊंट कांचनजुंगावर यशस्वी चढाई केली होती. माऊंट अमा दब्लम हे चढाईच्या दृष्टीने आव्हानात्मक शिखर आहे. खुंबू खोऱ्यात एव्हरेस्ट परिसरात हे शिखर वसलेले असून उंचीने एव्हरेस्टपेक्षा कमी जरी असले तरी शिखर चढाईची काठिण्य पातळी ही एव्हरेस्ट शिखर चढाईपेक्षा अवघड मानली जाते.
एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या वाटेवर पूर्व दिशेला माऊंट अमा दब्लमउभे असून ट्रेकच्या वेळी सर्वांचेच लक्ष वेधून घेते. शिखराचा विस्तीर्ण पसरलेला नैर्ऋत्य कडा हा जगभरातील गिर्यारोहकांना खुणावत असतो. चढाई मार्गावर कॅम्प 1 ते कॅम्प 3 च्या दरम्यान 60 ते 70 अंश कोनाची तीव्र खडा चढ आहे. येथे चढाई करताना आईस क्लायंबिंग, रॉक क्लायंबिंगसारख्या गिर्यारोहणातील कौशल्यपूर्ण तंत्रांच्या आधारे चढाई करावी लागते. अशा अवघड असणाऱ्या “माऊंट अमा दब्लम’ शिखरावर चढाई मोहीम यशस्वी करणे, हे हिमालयात केल्या जाणाऱ्या गिर्यारोहणात मैलाचा दगड समजला जातो.