“लॉकिंग’वरुन वादंग : भवन विभागाचे अधिकारीही संतापले
पुणे – प्रभागात निधी उपलब्ध करून देण्यासाठी “लॉकिंग’ देण्यावरून झालेल्या वादामधून महापालिकेच्या भवन विभागाच्या अधिकाऱ्यांना नगरसेविकेच्या पतीने थेट शिवीगाळ केली. मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी आरडाओरडा ऐकून गर्दी जमा झाली होती.
या प्रकरणावर नगर अभियंत्यांच्या मध्यस्थीने पडदा पडला, मात्र संबंधित पतीचे प्रताप दिवसेंदिवस वाढतच असून, अनेक अधिकाऱ्यांना त्याचा अनुभव आला आहे. त्यामुळे अधिकारी या विरुद्ध अभियंता महासंघाकडे तक्रार करणार आहेत.
महापालिकेमध्ये काही महिला नगरसेवक अक्षरश: “सह्याजीराव’ म्हणून काम करतात. यातील बहुतांश नगसेविकांचे पतीच महापालिकेमधील कामे करताना, कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतात. सत्ताधारी पक्षाच्या एका नगरसेविकेचे पतीही अधिकाऱ्यांकडे बसून अशीच कामे करून घेतात. याच कामसंदर्भात हे पतीराज भवन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कक्षात गेले. तेथे निधीवरून दोघांमध्ये वाद झाले. त्याचे रुपांतर शिवीगाळीत झाले.
यावर संतापलेल्या पतीराजांनी अधिकाऱ्याला शिवीगाळ केली. हा वाद विकोपाला गेल्यावर संबंधित अधिकाऱ्याने अभियंता संघाचे अध्यक्ष असलेल्या नगर अभियंत्यांकडे जाऊन कैफियत मांडली. त्यावेळी नगरसेविकेचे पतीही सोबतच होते. यानंतर नगर अभियंत्यांनी दोघांची समजूत काढून प्रकरण शांत केले.
आचारसंहिता तयार होणार का?
नगरसेविकांच्या पतींकडून अधिकाऱ्यांना सर्रास दमदाटी करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. मागे एका नगरसेवकाने अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला चप्पल फेकून मारली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आचारसंहिता बनवण्याचा आग्रह धरत असहकार पुकारला होता. मंगळवारच्या विषयाबाबत अजून तक्रार करण्यात आली नसली, तरी अभियंता संघासोबत चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाईल, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.