- महिनाअखेरपर्यंत अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु होणार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने पेठ क्रमांक 12 येथील गृहप्रकल्पात साडेतीन हजारांपेक्षा अधिक घरे बांधून तयार आहेत. या प्रकल्पातील घरांसाठी नागरिकांचे अर्ज मागविण्याची प्रक्रिया महिनाअखेरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. डिसेंबर अखेरच या प्रकल्पातील घरांसाठी अर्ज मागविले जाणार होते. मात्र, विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता, कोविडमुळे निर्माण झालेली परिस्थिती व अन्य कारणांमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
पेठ क्रमांक 12 येथील गृहप्रकल्पात एकूण 52 हेक्टर क्षेत्रापैकी 9.43 हेक्टर क्षेत्रावर हा गृहप्रकल्प साकारत आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एकूण 4 हजार 883 सदनिका उभारण्यात येत आहे. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) 3 हजार 317 तर, अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) 1 हजार 566 सदनिका उभारल्या जात आहे. ईडब्ल्यूएस सदनिकांचे कार्पेट क्षेत्र प्रत्येकी 317.50 चौरस फूट इतके आहे. तर, 2 बीएचके सदनिकांचे कार्पेट क्षेत्र प्रत्येकी 637.81 चौरस फूट इतके आहे. मार्च-2019 मध्ये या गृहप्रकल्पाचे काम सुरू झाले. काम पूर्ण करण्यासाठी मार्च-2021 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. प्रकल्पात प्रत्येकी 11 मजल्याच्या एकूण 45 इमारती उभारण्यात येणार आहे.
पेठ क्रमांक 12 मधील गृहप्रकल्पात ईडब्ल्यूएसमधील 2 हजार 515 घरांचे बांधकाम झालेले आहे. तर, एलआयजीमधील 1 हजार 217 घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ईडब्ल्यूएसमधील घर 9.90 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होणार आहे. तर, एलआयजी सदनिका 32 लाखांपर्यंत मिळणार आहे. ईडब्ल्यूएस आणि एलआयजीमधील घरांसाठी एकाच वेळी अर्ज प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता या गृहप्रकल्पासाठी जानेवारी अखेर नागरिकांचे अर्ज मागविले जाणार आहेत.
प्रकल्पामध्ये मिळणार विविध सुविधा
गृहप्रकल्पात 12 व 15 मीटर रुंद अंतर्गत डांबरी रस्ते उभारण्यात येणार आहे. रहिवाशांसाठी पायाभूत सुविधांसोबतच खेळाची दोन मोठी मैदाने, क्लब हाऊस, बगीचे, सोलर वॉटर हीटर, सौरऊर्जेवर विद्युत व्यवस्था आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
पेठ क्रमांक 12 येथील गृहप्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी मार्च-2021 पर्यंत मुदत आहे. गृहप्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत.
– प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता, प्राधिकरण.