भारावलेले इराकी नागरिक म्हणाले…”रायगड पोलीस नंबर वन’

रायगड – भारतात आलेल्या तीन इराकी नागरिकांचा मुद्देमाल लुटारूंनी लंपास केला. हा मुद्देमाल काही तासांत शोधून काढत पोलिसांनी त्यांना सुखद धक्का दिला. इतकेच नव्हे, तर यातील एका इराकी व्यक्तीचा त्याच दिवशी वाढदिवस असल्याने तो पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला. यामुळे भारावलेल्या इराकी पाहुण्यांनी “रायगड पोलीस नंबर वन’ म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

 

रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इराकी व्हिसावर तालिब ओमेर अहमद, अहमद ओमेर अहमद आणी रेबन साहली हे भारतात आले होते. मुंबई विमानतळावर लुटारू टोळीने तिघांची दिशाभूल करत अपहरण केले होते. त्यांच्या मोबाइलसह रोख रक्कम लुटली. यानंतर खंडणीसाठी इराकमधील नातेवाईकांशी संपर्क करण्यास भाग पाडले.

 

 

इराकी नागरिकांना घेऊन लुटारू टोळी महामार्गावरुन जात असताना, पोलिसांना याची माहिती मिळाली. दरम्यान, खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी अवघ्या 48 तासांत आरोपींना अटक करत मुद्देमाल हस्तगत केला. यानंतर इराकी नागरिकांना शनिवारी त्यांचा मुद्देमाल घेण्यासाठी बोलावण्यात आले.

 

 

उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या हस्ते इराकी नागरिकांनी मुद्देमाल स्वीकारला. दरम्यान, यातील तालीब अहमदचा वाढदिवस असल्याची पोलिसांना कल्पना होती. त्यांनी मुद्देमाल दिल्यावर केक आणून तालिबचा वाढदिवस साजरा केला. हा इराकी नागरिकांसाठी एक सुखद धक्काच होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.