- 13 रुग्णांचा मृत्यू
- आत्तापर्यंतची सर्वाधिक नोंद
पिंपरी – गेल्या आठवड्यापासून शहरातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले असतानाच आजपर्यंतच्या सर्वाधिक बाधित रुग्णांची नोंद आज (मंगळवारी) झाली. गेल्या गेल्या चोवीस तासांत 1558 जणांना करोनाची बाधा झाली असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर बाधितांच्या आकड्यानेही आज सव्वा लाखाचा टप्पा ओलांडला आहे.
सोमवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (मंगळवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 1519 जणांना करोनाची लागण झाली असून शहराबाहेरील 39 जणांचा करोना अहवाला सकारात्मक आला आहे. तर गेल्या 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील दहाजण शहरातील रहिवाशी होते. तर शहराबाहेरील तीन रहिवाशांचा मात्र महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1933 वर पोहोचला असून शहराबाहेरील 810 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 2743 ची संख्या आज गाठली.
गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील आकुर्डी, पिंपळे सौदागर, चिंचवड, मोशी, वल्लभनगर, कासारवाडी, दापोडी, चिखली, पिंपरी, भोसरी येथील नागरिकांचा समावेश आहे. महापालिका हद्दीबाहेरील खेड, वडगावशेरी आणि पुणे येथील रहिवाशी असलेल्या प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत शहरातील 1 लाख 25 हजार 71 जणांना करोनाची बाधा झाली असून त्यापैकी 1 लाख 11 हजार 216 जण करोनामुक्त झाले आहेत. शहराबाहेरील रहिवाशी असलेले मात्र शहरात उपचार घेणाऱ्या 8432 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 812 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 990 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेल्या 4889 जणांची महापालिकेच्या विविध रुग्णांलयांमध्ये करोना चाचणी करण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयात 36 करोनाबाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि. 23) 36 करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, एकाचा करोनाने मृत्यू झाला. पिरंगुट (ता. मुळशी), राजगुरूनगर, सदाशिव पेठ, सहकारनगर (पुणे), औंध, तळेगाव दाभाडे, दापोडी, रावेत, पिंपळे गुरव, जुनी सांगवी, नवी सांगवी, बाणेर, कोंढवा, पाषाण-सूस रस्ता आदी परिसरातील हे रुग्ण आहेत. पिरंगुट (ता. मुळशी) येथील 85 वर्षीय ज्येष्ठाचा सोमवारी (दि. 22) उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना सोमवारीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयातून आज बरे होऊन 9 रुग्ण घरी परतले. कात्रज, सांगवी, विशालनगर-जगताप डेअरी, कोंढवा, पिंपळे निलख, बाणेर आदी परिसरातील हे रुग्ण आहेत.
रुग्णालयात सध्या 80 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 24 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरातील प्रत्येकी एका करोना संशयित रुग्णाला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 2 हजार 350 जणांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यातील 887 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 888 रुग्णांना होम क्वॉरंटाइन केले आहे. 312 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविण्यात आले. एकूण 183 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.