बोल्डर (कोलोरॅडो) – कोलोरॅडोमधील सुपरमार्केटमध्ये आज झालेल्या गोळीबारात 10 जण ठार झाले. मृतांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समवेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. मात्र त्याचे नाव उघड करण्यात आलेले नाही. पत्रकार परिषदेमध्ये बोल्डर पोलीस प्रमुख मॅरिस हेरोल्ड यांना आपले अश्रु रोखून धरणे अवघड जात होते.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली आहे. या गोळीबारामागील नेमका हेतू स्पष्ट होऊ शकलेला नाही. हा गोळीबार झाला त्यावेळी नागरिक सुपरमार्केटमध्ये खरेदी करत होते. मरण पावलेल्या 51 वर्षीय पोलीस अधिकाऱ्याचे नाव एरिक टल्ली असे होते. ते 2010 पासून बोल्डर पोलिसात कार्यरत होते, गोळीबाराचे वृत्त समजल्यावर ते प्रत्यक्ष तेथे दाखल झाले होते. जखमी झालेल्या संशयिताला पोलिसांनी घटनास्थळावरून हलवले आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. या गोळीबारात मरण पावलेल्या नागरिकांना न्याय मिळवून दिला जाईल, असे बोल्डर कौंटीचे डिस्ट्रीक्ट ऍटर्नी मायकेल डघेर्टी म्हणाले.
हा हल्ला अमेरिकेतील यंदाचा सातवा सामूहिक गोळीबाराचा प्रकार होता, याच महिन्यात 18 मार्चला ऍटलांटा भागात झालेल्या गोळीबारात 8 जण ठार झाले होते.