लोणी काळभोर- हवेली तालुक्यामधील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने बुधवारी (दि. 8) दिवसभरात उच्चांक गाठला असून, संपूर्ण तालुक्यात बुधवारी दिवसभरात नव्वदहून अधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे हवेली तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा तीनशे नव्वदवर पोचला आहे.
विशेष बाब म्हणजे संपुर्ण हवेली तालुक्यात बुधवारी दिवसभरात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी तब्बल सत्तर टक्क्यांहून अधिक रुग्ण पूर्व हवेलीमधील मांजरी बुद्रुक, लोणी काळभोर, उरुळी कांचन, शेवाळेवाडी, वाघोली या प्रमुख ग्रामपंचायत हद्दीमधील आहेत.
यामुळे पूर्व हवेली करोनाचा हॉटस्पॉट बनल्याचे दिसून येत आहे. हवेली तालुक्यात मागील अडीच महिन्याच्या कालावधीत आढळून आलेल्या रुग्णांच्या संख्येचा विचार करता, बुधवारी आढळून आलेल्या रुग्णांची संख्या उच्चांकी असल्याची कबुली हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली.
उरुळी कांचन (14), वाघोली (13), मांजरी बुद्रुक (13), शेवाळवाडी (5), लोणी काळभोर व कदमवाकवस्ती (6), खडकवासला (11) व फुरसुंगी (10) या प्रमुख ग्रामपंचायत हद्दीत रुग्ण आढळन आले आहेत. बुधवारी दिवसभरात नव्वदहून अधिक करोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्ण दुप्प्टीचा वेग अकरा दिवसांवरून दहा दिवसांवर आला आहे. तालुक्यातील रुग्णांच्या वाढत्या संख्येवर मर्यादा घालण्यासाठी प्रशासनाने करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची सखोल चौकशी सुरु केली आहे. तर रुग्णांच्या स्वॅबची तपासनी संख्या वाढवली आहे.