“इग्निटर कॉम्प्लेक्स’ इमारतीचे संरक्षण राज्यमंत्री नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे – शहरातील हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल)ने उभारलेल्या “इग्निटर कॉम्प्लेक्स’ या इमारतीचे उद्घाटन संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते मंगळवारी झाले. संस्थेतर्फे क्षेपणास्त्रातील मोटारसाखळी प्रज्वलित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका असलेल्या इग्निटरच्या तपासणीसाठी विविध सुविधा या इमारतीत निर्माण करण्यात आल्या आहेत.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची (डीआरडीओ) एक प्रमुख प्रयोगशाळा असलेल्या “एचईएमाअरएल’ संस्थेत प्रामुख्याने क्षेपणास्त्र आणि बंदुकीतील वैशिष्ट्येपूर्ण घटकांसंदर्भातील संशोधन आणि निर्मितीचे काम केले जाते. संस्थेतर्फे आतापर्यंत विविध महत्त्वपूर्ण क्षेपणास्त्रांसाठी इग्निशन यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. या निर्मितीसाठी विविध चाचण्यांची आवश्यकता असते.
या चाचण्यांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये इग्निशन यंत्रणेचा आराखडा, प्रक्रिया आणि त्याचे मूल्यमापन करण्यासाठी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध घटकांचे एकत्रिकरण, साठवणूक आणि चाचणी केंद्र यांचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, इग्निशन कॉम्प्लेक्समुळे यंत्रणेच्या निर्मितीसाठी आवश्यक सर्व घटक एकत्रितपणे उपलब्ध होत असल्याने, संस्थेच्या कामाची गती वाढण्यात मोलाची मदत मिळणार असल्याची आशा “एचईएमआरएल’ने व्यक्त केली.