ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करणार

वाई – वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर तालुक्‍यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने अहवाल सादर करुन तात्काळ शासनदरबारी प्रस्ताव पाठविण्यात यावेत, असे आदेश आमदार मकरंद पाटील यांनी महसूल विभागाला दिले आहेत. दरम्यान, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊनच पचनामे करावेत अशा सूचना करत मतदार संघात ओला दुष्काळ जाहिर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून त्यासाठी योग्य प्रस्ताव करण्याचेही सांगितले आहे. पंचायत समितीच्या सभागृहात वाई, खंडाळा व महाबळेश्‍वार तालुक्‍यात परतीच्या पावसाने अतिवृष्टीने झालेल्या गावांचा नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निबांळकर, प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापुरकर, बाळासाहेब भिलारे, प्रतापराव पवार, जिल्हा परिषद कृषी सभापती मनोज पवार, पंचायत समितीच्या सभापती सौ. रजनी भोसले, उपसभापती अनिल जगताप, वाईचे तहसीलदार रणजित भोसले, खंडाळाचे तहसीलदार दशरथ काळे, महाबळेश्‍वररच्या तहसीलदार सुषमा पाटील, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, तालुका कृषी अधिकारी हरिश्‍चंद्र धुमाळ, राजेंद्र राजपुरे, पंचायत समिती सदस्य विक्रांत डोंगरे, मधुकर भोसले, शशिकांत पवार, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे वाई, खंडाळा, महबळेश्‍वर, पदाधिकारी, अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तीन्ही तालुक्‍यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या खात्याचा आढावा सादर केला.

अतिवृष्टीमुळे नुकसान व पंचनाम्यांचे सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली. महाबळेश्‍वर तालुक्‍यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्याने स्ट्रॉबेरीसह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 1709 हेक्‍टर नुकसान झालेल्या शेतजमिनीचे पंचनामे करण्यात आले असून अजूनही हा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा, रस्ते, शेतजमिनीचे बांध, साकव पूल, बंधारे यांचे पंचनामे करण्यात आले असून त्यांचे प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आ. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या घरांचे, विहिरीचे, शेतजमिनीचे, जनावरांचे पंचनाम करून प्रस्ताव सादर करावेत. जे पुल वाहून गेले असतील किंवा रस्ते खराब झाले असतील त्यांची तात्पुरती डागडुजी करून वाहतूक सुरू करावी. तसेच त्यांचे नवीन प्रस्ताव शासनाकडे त्वरीत पाठवावेत असे सांगितले.

वाईच्या पश्‍चिम भागात तीन हजार आठशे हेक्‍टरवर भात शेती असून तीन हजार हेक्‍टर जामिनीत सोयाबीन करण्यात आले होते. 350 घरांचे नुकसान झाले आहे. तर अंदाजे सहा हजार हेक्‍टरहून अधिक शेतजमीनीचे नुकसान झाले आहे, असे कृषी अधिकारी हरिश्‍चंद्र धुमाळ यांनी माहिती दिली. तसेच काही गावांमध्ये बंधारे वाहून गेले असून पाझर तलावांना गळती लागली असल्याचे सांगितले. तसेच एक तरुणही पुरात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे तहसिलदार दशरथ काळे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.