मंगळवारची स्थिती, पण दिवसभरात 21 मृत्यू
पुणे – मागील आठवड्यापासून दररोज आठशेपार जाणारी नव्या करोना बाधितांची संख्या मंगळवारी 640 पर्यंत खाली आली. तर, दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 672 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, दिवसभरात 21 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
स्वॅब तपासणीची संख्या वाढताच बाधितांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंत बाधित संख्येने 23 हजार 21 चा टप्पा पार केला आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात 3 हजार 467 संशयितांचे व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. तर, 386 जणांच्या रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या. सद्यस्थितीत शहरातील विविध रुग्णालयांत 7, 859 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 385 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 63 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. तर 322 बाधित हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.
सात दिवसांत 108 करोनाबळी
शहरात करोना बाधितांच्या वाढत्या संख्येपेक्षा दररोज होणाऱ्या मृत्यूंमुळे प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. गेल्या सात दिवसांत (दि. 1 ते 7 जुलै) तब्बल 108 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दि. 7 रोजी सर्वाधिक 21, तर दि. 1 जुलै रोजी 19 जणांचा मृत्यूंची नोंद आहे. दि. 3 जुलै रोजी 9, अन्य 4 दिवसांत सरासरी 12 पेक्षा अधिक जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.