नवी दिल्ली/मुंबई – लॉकडाऊन उठविण्याच्या टप्प्यात चित्रपट निर्मिती पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सांगितले.
कोविडमुळे पूर्णतः ठप्प झालेल्या चित्रपटसृष्टीला पुन्हा गती प्रदान करण्यासाठी, आम्ही टीव्ही मालिका, चित्रपट-निर्मिती, सह-निर्मिती, ऍनिमेशन, गेमिंग यासह सर्व क्षेत्रातील निर्मितीला प्रोत्साहन देत आहोत. आम्ही लवकरच यासाठीच्या उपायांची घोषणा करणार आहोत, असे जवडेकर यांनी नमूद केले. फिक्की फ्रेम्सच्या 21 व्या भागाला संबोधित करताना जवडेकर बोलत होते.
कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर, प्रसार माध्यमे आणि करमणूक उद्योगाच्या वार्षिक मेळावा 2020 च्या भागाचे आयोजन यावर्षी आभासी पद्धतीने करण्यात आले होते. त्यात सहभागी झाल्यावर जावडेकर यांनी ही माहिती दिली.
कोविड साथीच्या आजाराने, लोकांना संवाद साधण्याच्या नवीन मार्गांचा विचार करण्यास भाग पाडले आहे. आभासी मेळावे हे आता सामान्य झाले आहेत. परंतु भागीदारी मात्र खरी आहे. मजकूर निर्मिती (कंटेन्ट क्रिएशन) मध्ये भारताला मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि जगभरातील 150 हून अधिक देशांमध्ये भारतीय “कन्टेन्ट’ पाहिला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारताला ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेत परावर्तित करण्यामध्ये सर्जनशील उद्योगाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. व्हॉल्यूमवरून व्हॅल्यू क्रिएशनवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही ते म्हणाले.