श्रीनगर -जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झडली. त्या चकमकीत तीन जवान जखमी झाले. त्याशिवाय, एक दहशतवादी मारला गेल्याचा अंदाज आहे. पुलवामा जिल्ह्यातील गावात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी विशेष मोहीम हाती घेतली.
त्या मोहिमेवेळी आमनेसामने आल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये चकमक झाली. त्यामध्ये जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी तातडीने लष्करी रूग्णालयात हलवण्यात आले. चकमकीवेळी एका घरात दडलेल्या एका दहशतवाद्याने पलायनाचा प्रयत्न केला.
त्याच्यावर जवानांनी मारा केला. त्यामध्ये तो मारला गेल्याची शक्यता आहे. त्यानंतरही बराच काळ त्याच्या साथीदारांसमवेत जवानांची चकमक सुरू होती. त्या चकमकीचा पूर्ण तपशील तातडीने मिळू शकलेला नाही.