नगर (प्रतिनिधी) – रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा करोनाच्या पार्श्वभूमीवर अचानकपणे रद्द करण्याचा निर्णय एमपीएससीने जाहीर केला आहे. या निर्णयाविरोधात अहमदनगर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा नगर शहरात काढण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी तीव्र भावना व्यक्त करत एमपीएससीचा निर्णय अन्यायकारक असून तो तातडीने मागे घेण्यात यावा आणि विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची वाट मोकळी करून द्यावी, असा एकसुरी आवाज आंदोलक विद्यार्थ्यांचा होता.
काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात विद्यार्थी काँग्रेसचे उत्कर्ष झावरे, जाहिद शेख, सुजित जगताप, प्रशांत जाधव, सचिन वारुळे, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, स्वप्नील पाठक, उद्धव माने आदींसह काँग्रेस पदाधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
बालिकाश्रम रोड येथून या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. मोर्चामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
मोर्चा निलक्रांती चौकामध्ये आला त्यावेळी आंदोलकांनी रास्ता रोको करण्याची भूमिका घेतली. मात्र, पोलीस प्रशासनाच्या आवाहनानंतर सामंजस्य दाखवत निलक्रांती चौकातच आंदोलकांनी ठिय्या मांडला.