पुणे -मान्सून दोन दिवस उशिरा दाखल झाला होता. मान्सूनने संपूर्ण केरळ व्यापला असून, कर्नाटक किनारपट्टी आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात मान्सून दाखल झाला आहे.
तर येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
मान्सूनच्या आगमनाच्या सर्वसाधारण तारखेपेक्षा यंदा दोन दिवस उशिराने मान्सून केरळात दाखल झाला आहे. तर आता केरळनंतर गोवा आणि कोकणासह राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून दाखल होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
गुरुवारी पश्चिम किनारपट्टीवर कारवारपर्यंत मान्सून पोहोचला होता. कारवार, हरपनाहल्ली, अनंतपूर, वेल्लोर, नागपट्टीनम येथून मान्सून जात आहे.
दरवर्षी राज्यात सुमारे 7 जून रोजी मान्सून दाखल होता. तर जूनच्या मध्यभागी पावसाळा संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो.
मात्र यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने पुण्यात सुमारे 10 जूनच्या आसपास मान्सून दाखल होणे अपेक्षित आहे. तर 11 ते 17 जूनदरम्यान राज्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.