पुणे, – यवत पोलीस ठाणे हे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील इंदापूरनंतरचे मुख्य आणि क्रीमपोस्ट असणारे पोलीस ठाणे आहे. आता नव्याने यामध्ये उरुळी कांचन पोलीस ठाण्याचा सहभाग जरी झाला असला तरी यवत पोलीस ठाणे हे पुणे बाजूकडील महामार्गावरील मुख्य पोलीस ठाणे मानले जाते. या हद्दीत अवैध उद्योग करणारे हे परप्रांतीय आहेत. याची संख्या मोठी आहे.
याच महामार्गांवरुन पोलीस प्रशासनाची एवढी सुरक्षा यंत्रणा असताना देखील ती भेदून दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासह दौंडमध्ये गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात आहे. याठिकांनी असणाऱ्या गुटखा माफियांना घरपोच गुटखा मिळत असल्याने त्यांची चंगळ होत आहे.
सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्याच्या पश्चिम सीमेवरील बोरिऐंदी ते पूर्व भागातील स्वामी चिंचोलीपर्यंत रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या हॉटेल ते गावागावातील किराणा दुकानावर सहज गुटखा विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. यांचे जाळे हे तालुक्यात वाड्यावस्त्यावर पसरलेले आहे.
पश्चिम पट्ट्यातील सहजपूर, यवत, राहू, वरवंड, पारगाव याठिकाणी स्थानिक नागरिकांचा या काळ्या धंद्यात सहभाग असल्यामुळे हा काळा धंदा दिवसांच्या पांढऱ्या शुभ्र उजेडात उजळ माथ्याने नागरिक करीत आहेत. दररोज सरासरी १० लाखांची उलाढाल होत असून कोणी त्यांच्याविरोधात बोलण्यासाठी तयार होत नसल्याने त्यांची मोठी दहशत असल्याचे दिसून येत आहे.
पारगाव येथील एक परप्रांतीय हा देखील मोठ्या प्रमाणात गुटख्याचा व्यापार करीत असून स्थानिक बाजारपेठेसह शिरूर तालुक्यात नदीच्या पलीकडे तो व्यवसाय करीत असल्याने प्रशासनास हद्दीच्या फायदा घेत सुरक्षित व्यवसाय करीत असल्याने देखील आपल्या काळ्या धंद्याच्या कामाची चलाखी दाखवायला तो विसरत नसल्याचे चित्र आहे.
स्थानिक आणि परप्रांतीय मिळून आपले साम्राज्य दौंड तालुक्यात निर्माण केल्यामुळे त्यांना एक प्रकारे प्रशासन काही करू शकत नसल्याची भावना मनात निर्माण झाल्याने याच सर्व प्रशासनाविरुद्ध नागरिकांत संताप असल्याची चर्चा सुरु असून नेमके या गुटखा माफियांना कुणाचा वरदहस्त, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
विद्यार्थी व्यसनाच्या वाटेवर
शाळा- महाविद्यालयाच्या आवारात देखील गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. हॉस्पिटलच्या आवारात छोट्या पानटपऱ्यांवर गुटखा्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे विद्यार्थी देखील व्यसनाधीन झाले आहेत. यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने पालकांतून संताप व्यक्त होत आहे.