यवत, {मनोज खंडाळे} – सध्या यवत पोलीस ठाणे आणि दौंड पोलीस ठाणे यांच्या दोनही अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्यानंतर याठिकाणी नवीन पदभार घेतलेल्या अधिकाऱ्यांनी हद्दीतील सर्व काळे धंदे तात्काळ बंद करत काळ्या धंद्येवाल्यांचे कंबर्डे मोडले. मात्र, याठिकाणी वर्षानुवर्षे गुटख्याचा व्यवसाय करणारे स्थानिक आणि परप्रांतीयांनी मात्र आपला व्यवसाय सुरु ठेऊन एक प्रकारे पोलीस प्रशासनाला आव्हान दिले नाही काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर तालुक्याच्या पूर्व भागातील स्वामींची चिंचोली ते पश्चिम भागातील बोरिभडकपर्यंत महामार्गाच्या दोनही बाजूने सुमारे दोन ते अडीच हजार ढाबे आणि त्याच्याबाहेर पानटपऱ्या आहेत. या पानटपाऱ्या आणि तालुक्यातील गावागावातील आणि वस्त्यावरील सुमारे तेवढ्याच दोन अडीच हजार संख्येचे किराणा दुकान छोट्या- मोठ्या टपऱ्या यांच्यावर खुलेआम गुटख्याची विक्री केली जाते. तालुक्यातील केडगाव, पाटस, वरवंड, भांडगाव, कुरकुंभ आणि इतर महामार्गांवर असणाऱ्या गावात औद्योगिक वसाहत असणाऱ्या भागात येथील परप्रांतीय असणाऱ्या कामगारांमुळे येथील विक्री कमी अधिक प्रमाणात होत आहे. मोठ्या बाजारपेठाच्या ठिकाणी असणारे मजूर अड्डे यांच्या ठिकाणची देखील गुटखा विक्री मोठया प्रमाणात आहे.
तालुक्यात सुमारे महामार्ग आणि वाड्या- वस्त्या गावातील किराणा दुकानात आणि टपऱ्यावरील दुकानदार मजूर अड्डे, औद्योगिक वसाहतीतील कामगार दररोज दोनशे रुपयांचा गुटखा विक्री केला तरी दिवसभरात तालुक्यात लाखो रुपयांचा गुटखा विक्री केला जातो. महिन्याकाठी तीन कोटींची रुपयांची उलाढाल गोरखधंद्यातून केली जात असल्याची चर्चा नागरिकांच्यामध्ये आहे. या लाखो-कोट्यावधी रुपयांमधून काही लाखांचा वाटा प्रशासनाच्या देखील घशात घालत असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच गुटखा माफियांना अभय मिळत असून यांच्यावर प्रशासन कारवाई करण्यास धजावत नसल्याची गंभीर बाब आहे.
वसुली पंटरमुळे अधिकाऱ्याच्या नावाला काळिमा
तालुक्यात दोनही पोलीस अधिकारी हे कर्तव्यदक्ष असून त्यांनी काळे धंदे वाल्यांचे धाबे दणाणले असताना काही पोलीस खात्यातील पंटर यांच्या आणि माफिया यांच्या अर्थकारणामुळे खमक्या आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या नावाला कुठेतरी काळिमा फासली जात आहे, असा सूर उमटत आहे.
मुख्य डीलर नामानिराळा
दौंड तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बंदी असतानाही गुटखा कुठून येत आहे आणि त्याचीच एवढ्या मोठ्या प्रमाणात तालुक्याच्या हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटख्यांची विक्री केली जात आहे. याबाबत अन्न औषध विभाग आणि पोलीस प्रशासन यांना कानाची खबर कशी नाही. नेमका गुटखा कुठून येतो आहे. याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. मुख्य डीलरच्या खिशात हे दोन्हीही विभाग असल्याचा आरोप सामाजिक संघटना, नागरिकांमधून होत आहे. मुख्य डीलरवर कारवाई होणार का. अशी देखील चर्चा लोक करीत आहेत.
पोलीस- एफडीएची कारवाई कधी
गुटखा माफियामुळे पोलीस प्रशासन आणि अन्न औषध प्रशासनाचे नाव डागळले जात असल्याची चर्चा रंगत असताना या माफियांवर दोन्हीही विभाग संयुक्तिकरित्या कारवाई करणार का, हा धाडसी प्रश्न उपस्थित होत आहे.