उरुळी कांचन, (वार्ताहर) – उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे – सोलापूर महामार्गावर व शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात दोन वाहनचालकांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय ज्ञानेश्वर कांबळे (वय 23, रा. गिरमेवस्ती बालाजी नर्सरी उरुळी कांचन; मूळ रा. जेवळी, ता. लोहारा जि. धाराशिव) व किसनराव बबनराव भोंडवे (वय 63, रा. कासुर्डी भोंडवे वस्ती, ता. दौंड) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी ज्ञानेश्वर मल्हारी कांबळे (वय 48) व संदीप किसनराव भोंडवे (वय 33) यांनी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मंगळवारी (दि. 19) ज्ञानेश्वर कांबळे यांचा मुलगा अजय कांबळे हा दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नवीन कॅनॉलचे पुलावरून रस्ता ओलांडत असताना अज्ञात दुचाकीने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्यास, शरीरास लहानमोठ्या गंभीर दुखापती होऊन गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या घटनेत किसनराव भोंडवे शनिवारी (ता. 16) हे पुणे – सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास निघाले होते. यावेळी सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील श्रेयस फ्लोरा नर्सरी आले असता त्यांना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार ठोसर दिली.
या दोन्ही अपघातातील जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक उमेश जगताप व पोलीस हवालदार जगताप हे करीत आहेत.