नगर – महाराष्ट्राचे वैभव असलेल्या कुस्ती खेळानेच राजकारणाला चितपट व पटकणीसारखे शब्द दिले आहेत. पण ग्रामीण विकासात योगदान देणारी कुस्ती राजकारण विरहित असायला हवी. मात्र, काही लोकांची यात मक्तेदारी झाली होती. महाराष्ट्र कुस्ती परिषद, महाराष्ट्र परिषद आमचीच असे त्यांना वाटत होते. पण ती मक्तेदारी भाजपने मोडून काढली व आता राज्यात कोणीही कुस्ती स्पर्धा आयोजित करू शकतो, असा शाब्दिक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे बोलताना राष्ट्रवादीचे नाव न घेता लगावला.
येथील वाडियापार्क मैदानावर आयोजित छत्रपती शिवराय केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन तुतारी व हलगीच्या निनादात अन् फटाक्यांच्या आतषबाजीत उत्साहात झाले. भाजप, शिवसेना व जिल्हा तालिम संघाने आयोजित केलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खा. डॉ. सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी, सरचिटणीस रवी अनासपुरे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहराध्यक्ष महेंद्र गंधे, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिवसेनचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जिल्हा तालिम संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे, बाबासाहेब वाकळे, सुवेंद्र गांधी आदींसह अन्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या बजेटमध्ये तब्बल 500 कोटींची तरतूद खेळांच्या विकासासाठी केली असल्याने खेळाडूंना त्याचा फायदा होईल, असे सांगून बावनकुळे म्हणाले, नगरला भाजप-मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेने आयोजित केलेली कुस्ती स्पर्धा जिल्ह्याच्या कुस्ती विकासाला अधिक चालना देणार आहे.मोबाईल युगातही कुस्तीचे महत्त्व अबाधित राखण्याचे काम या स्पर्धेतून होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मंत्री विखे म्हणाले, ग्रामीण भागाचे आकर्षण असलेल्या कुस्तीला राज्य सरकारचे पाठबळ दिले जाणार आहे व उद्या येणाऱ्या सर्व कुस्त्या आम्ही चितपट करू, असे सूचक भाष्यही केले. दिलीप सातपुते यांनी स्वागत केले. वसंत लोढा यांनी प्रास्ताविक केले. खा. डॉ. विखे यांचेही भाषण झाले. सचिन पारखी यांनी आभार मानले. या स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त सुदर्शन कोतकर (नगर) व साकेत यादव (पुणे) ही झालेली खुल्या गटातील कुस्ती यादव याने 2 विरुद्ध 1 अशा गुण फरकाने जिंकली.
पुढच्या वर्षी विखेंची गदा
अर्धा किलो सोन्याची गदा असे मोठे आकर्षण नगरच्या या कुस्ती स्पर्धेचे आहे, असे आवर्जून कौतुक करून बावनकुळे म्हणाले, यंदा अर्धा किलोची गदा आहे. पण पुढच्या वर्षी विखे पिता-पुत्र प्रत्येकी अर्धा किलोची मिळून 1 किलो सोन्याची गदा देतील. तुम्हीच आमचे आधार असल्याने तुमच्या शिवाय कोणाकडे हे मागणार, अशी मिश्किल टिपणीही बावनकुळे यांनी विखेंकडे पाहून केली.