नवी दिल्ली : दिल्लीतील सुलतानपुरी परिसरात कारने धडक देऊन तब्बल ६ ते ७ किमी पर्यंत फरफटत नेल्याने २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे ४ वाजता रस्त्यावर नग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे पुन्हा एकदा दिल्लीसह संपूर्ण देश हादरून निघाला आहे.
दरम्यान, तरुणीच्या आईने अद्यापही आपल्या मुलीचा मृतदेह पाहिलेला नाही. मुलीच्या मृत्यूनंतर त्यांना मानसिक धक्का बसला आहे. “माझ्यासाठी माझी मुलगीच सर्व काही होती. काल ती कामावर गेली होती. संध्याकाळी ५.३० वाजता तिने घर सोडलं होतं. रात्री १० पर्यंत घरी येईन असं सांगून ती गेली होती,” हे सांगताना त्यांना अश्रू अनावर होत होते.
“मला तिच्या अपघाताची माहिती देण्यात आली आहे. पण मी अद्याप तिचा मृतदेह पाहिलेला नाही,” असे त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे. भावंडांमध्ये सर्वात मोठी असणाऱ्या तरुणीवर कुटुंबाची जबाबदारी होती. तिच्या मागे आई, चार बहिणी आणि दोन भाऊ असं कुटुंब आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले होते.
Delhi: Woman gets dragged on road for kms after hit by car, dies
Read @ANI Story | https://t.co/r3ChfGrKeK#Delhi #Delhiwoman #Delhipolice pic.twitter.com/uyS6sDHdjF
— ANI Digital (@ani_digital) January 1, 2023
दिल्ली पोलिसांनी कारमधील पाचजणांना अटक केली आहे. तरुणीच्या स्कुटीला धडक दिल्यानंतर तब्बल ६ ते ७ किमीपर्यंत त्यांनी तिला फरफटत नेले. यादरम्यान तिच्या शरिरावरील कपडेही फाटले. कारमधील सर्वजण मद्यधुंद अवस्थेत होते अशी माहिती समोर आली आहे.
स्थानिकांनी कार तरुणीला फरफटत नेत असल्याचे पाहिल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर काही वेळातच रस्त्याच्या मधोमध नग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळल्याचा फोन पोलिसांना आला होता. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवला आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी आपल्याला अपघाताची कल्पना आहे, मात्र गाडीखाली तरुणी असल्याची कल्पना नव्हती असा दावा केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.