मुंबई – मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी म्हणजेच, अभिनेत्री जेनेलिया यांच्या ‘वेड’ चित्रपटातने सध्या तरी सर्वांनाच वेड लावल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत असून, फॅन्सला देखील ही जोडी आवडली आहे. 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटाने सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांना देखील हा चित्रपट आवडला असून, रितेश आणि जेनेलिया यांना डोक्यावर घेतलं आहे.
दरम्यान, 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवलेला आहे. त्यांच्या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. चित्रपटाने दोन दिवसात किती रक्कम कमावले याचा आकडा आता समोर आला आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहिती नुसार या चित्रपटाने पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी 3.5 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 4.4 कोटींचा गल्ला जमवला. आतापर्यंत एकूण मिळून या चित्रपटाने 7.9 कोटींची कमाई केली आहे. यापुढे ही चित्रपट जोरदार कमाई करणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, 20 वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर, या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. यापूर्वी जेनेलिया यांनी हिंदी ,तेलगू ,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल 5 भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.